बेळगाव : नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनीच पेन्शन कर्मचाऱ्यांना द्यावी, या मागणीसाठी नैर्त्रुत्य रेल्वे मजदूर युनियनच्यावतीने बेळगाव रेल्वेस्थानकासमोर आंदोलन करण्यात आले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन जुन्या पेन्शनची मागणी लावून धरली. यामध्ये बेळगावमधील सर्व विभागांचे कर्मचारी सहभागी झाले होते. 2004 नंतर नोकरीत कायम झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. परंतु, यामुळे कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे. नव्या पेन्शन स्कीमविरोधात देशभर आंदोलने केली जात आहेत. सध्या रेल्वे कर्मचाऱ्यांचे देशभर आंदोलन सुरू असून, याचाच एक भाग म्हणून बेळगावमध्येही आंदोलन करण्यात येत आहे. साऊथ वेस्टर्न रेल्वे मजदूर युनियन हुबळी अंतर्गत बेळगावमधील कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. दि. 8 ते 11 जानेवारी दरम्यान हे आंदोलन करण्यात येत असून गुरुवारी याची सांगता होणार आहे. रेल्वेस्थानकाच्या शेजारील भागात तंबू ठोकून बेळगावमधील रेल्वे कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. यामध्ये संघटनेचे खजिनदार मुरलीधर कदम, यल्लाप्पा मुसलमानी, मल्लेशी किंगेरी, गुरुनाथ जी. यांच्यासह इतर सदस्य सहभागी झाले होते.
नवीन पेन्शन योजना रद्द करा…
नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनीच पेन्शन योजना सुरू ठेवावी, या मागणीसाठी देशभर रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. बेळगावमध्ये सातही विभागांचे साठहून अधिक कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. सरकारने कामगारांच्या या मागणीची दखल घेऊन नवीन पेन्शन योजना रद्द करावी.
– मुरलीधर कदम (नैर्त्रुत्य रेल्वे मजदूर युनियन खजिनदार)









