तीन दिवसांमध्ये रेल्वेब्रिजपासून पाटील गल्लीपर्यंतचे काम पूर्ण : नवीन एक्स्प्रेस सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार
बेळगाव : रेल्वेच्या गतीमध्ये वाढ होऊन इंधनाची बचत व्हावी, या उद्देशाने भारतीय रेल्वेकडून रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण केले जात आहे. मिरज ते लोंढा यादरम्यानच्या मार्गावर विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. केवळ तीन दिवसांमध्ये रेल्वेब्रिजपासून पाटील गल्लीपर्यंतचे काम पूर्ण करण्यात आले. विद्युतीकरणासाठी खांब उभे केले जात आहेत. तसेच विद्युतवाहिन्या ओढल्या जात आहेत. लोंढा ते बेळगाव यादरम्यानचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या बेळगाव शहर परिसरात विद्युतीकरणाचे काम करण्यात येत असून, लवकरच बेळगाव-हुबळी या मार्गाचे विद्युतीकरणही पूर्ण होणार आहे. रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासोबतच विद्युतीकरण केले जात आहे. विद्युतीकरणामुळे इंधनाची बचत तर होईलच, त्याचसोबत रेल्वेची गती वाढणार आहे. यामुळे प्रवासाचा एकूण कालावधी कमी होणार आहे. सध्या हुबळी ते बेंगळूर या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे वंदे भारतसारखी एक्स्प्रेस सुरू झाली. त्यामुळे बेळगावपर्यंतचे विद्युतीकरण लवकर पूर्ण झाल्यास नवीन एक्स्प्रेस सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.









