फूट ओव्हरब्रिजचे काम ठप्प : प्रवाशांची प्रचंड गैरसोय, लोकप्रतिनिधींनी तोडगा काढण्याची मागणी
बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानकातील फूट ओव्हरब्रिजचे काम लवकर पूर्ण करावे, अशी सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी केली होती. दोन महिने उलटले तरी खासदारांच्या सूचनेकडे कंत्राटदाराने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. केवळ एक-दोन कामगार फूट ओव्हरब्रिजचे काम करीत असून यामुळे प्रवाशांची दररोज गैरसोय होत आहे. रेल्वेस्थानकाच्या मधोमध असलेला फूट ओव्हरब्रिज सात-आठ महिन्यांपूर्वी काढण्यात आला. सध्या रेल्वेस्थानकात असलेला फूट ओव्हरब्रिज हा रेल्वेस्थानकाच्या शेवटच्या टोकाला असल्यामुळे प्रवाशांना तिथपर्यंत जाऊन सरकत्या जिन्याद्वारे पुन्हा प्लॅटफॉर्म क्र. 2 वर ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे अनेक प्रवासी थेट रेल्वेट्रॅकवरून ये-जा करीत असल्याचे वृत्त अनेक वेळा प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे खासदार जगदीश शेट्टर यांनी दोन महिन्यांपूर्वी रेल्वेस्थानकाची पाहणी करून फूट ओव्हरब्रिजचे काम वेळेत पूर्ण करण्याची सूचना केली होती.
खासदारांच्या सूचनेला कंत्राटदाराचे हरताळ
खासदारांच्या सूचनेला कंत्राटदाराने हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. दोन महिने उलटले तरी अद्याप या ठिकाणी बांधकामाचे कोणतेच काम सुरू नसल्याचे दिसून येत आहे. लोखंडी सळ्यांना गंज चढला असून, केवळ एक-दोन कामगार फूट ओव्हरब्रिजचे काम करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक बाजूला राहिले पण थेट खासदारांचेही कंत्राटदार ऐकत नसल्याची बाब समोर येत आहे.
तोडगा काढण्याची मागणी
फूट ओव्हरब्रिज नसल्यामुळे वयोवृद्ध प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. रेल्वेस्थानक स्मार्ट झाले तरी फूट ओव्हरब्रिज नसल्याने प्र्रवाशांना वजनदार बॅगा घेऊन प्लॅटफॉर्मच्या शेवटपर्यंत जावे लागत आहे. याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असून लोकप्रतिनिधींनी यातून तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.









