► वृत्तसंस्था / सुरत
देशात रेल्वेमार्गांवर अडथळे निर्माण करण्याचे प्रकार वाढत असतानाच गुजरातमधील सुरत येथेही असा प्रकार उघडकीस आला आहे. येथील रेल्वेमार्गाच्या फिशप्लेटस् काढल्याचा रुळांचे नटबोल्ट ढिले करुन ठेवण्याचा प्रकार शनिवारी घडला. या मार्गावरुन जाणाऱ्या प्रवासी रेल्वेला अपघात घडविण्याचे हे कारस्थान रेल्वेच्या दक्ष कर्मचाऱ्यांमुळे आणि काही नागरीकांमुळे उघडकीस आले. नंतर रेल्वेच्या इंजिनिअर्सनी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून नटबोल्ट घट्ट केले आणि फिशप्लेटची दुरुस्ती केली. कोसंबा आणि किम या रेल्वेस्थानकांमध्ये हा प्रकार घडला. सुरत ग्रामीणचे पोलीस महानिरीक्षक हितेश जोयसर यांनी ही माहिती दिली. गुजरातमध्ये रेल्वे मार्गांवर अडथळे निर्माण करण्याचा हा गेल्या तीन दिवसांमधील दुसरा प्रकार आहे. सुरतनजीक घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्यात येत असून पोलिसांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी पथके सज्ज केली आहेत.









