फळा-फुलांच्या मागणीत वाढ : महिलांची खरेदीसाठी वर्दळ
प्रतिनिधी/ बेळगाव
मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारनिमित्त बाजारात महिलावर्गांची वर्दळ वाढली होती. फळा-फुलांबरोबर हार आणि पूजेच्या साहित्यांची मागणी वाढली होती. पाचव्या गुरुवारी अमावस्या असल्याने चौथ्या गुरुवारीच पूजा पार पडल्या. त्यामुळे बुधवारी आणि गुरुवारी देखील बाजारपेठेत फळांची रेलचेल पाहायला मिळाली.
मागील तीन गुरुवार देखील फळा-फुलांनी बाजारपेठ बहरली होती. पूजेच्या साहित्यांबरोबर फळांचीही खरेदी झाली. चिकू 100 रु. किलो, सफरचंद 100 ते 140 रु. किलो, डाळिंब 120 ते 200 रुपये किलो, पेरू 100 रु. किलो, पपई 20 ते 40 रुपये एक, बोर 60 ते 80 रु. किलो, कलिंगड 80 ते 100 रुपयाला एक, अननस 50 ते 60 रुपयाला एक, सिताफळ 100 ते 120 रु. किलो, विलायची केळी 70 रु. किलो, जवारी केळी 50 ते 60 रु. डझन असा फळांचा दर आहे. विशेषत: पाच फळांना मागणी वाढली होती. शिवाय पाच फळांची 50 ते 120 रुपये दराने विक्री झाली. चौथ्या गुरुवारी विशेष पूजेची मांडणी करून गुरुवार व्रताची सांगता करण्यात आली.
मार्गशीर्ष महिन्याला प्रारंभ झाल्यापासून दर गुरुवारी फळा-फुलांची आणि पूजेच्या साहित्यांची मागणी अधिक होती. या महिन्यात महिलांकडून गुरुवारचे व्रत केले जाते. अलीकडे व्रत करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बाजारात देखील पूजेच्या साहित्याला मागणी वाढली आहे. शहराबरोबर ग्रामीण भागात देखील व्रत करणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हार, फुले, फळे, अंबोती, दुर्वा यासह पूजेच्या साहित्यांची रेलचेल वाढली आहे. बाजारपेठेतील गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, काकतीवेस आदी ठिकाणी फुला-फळांची विक्री सुरू आहे.









