रायगड/प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातल्या तळई गावात शुक्रवारी दरड कोसला आहे. यामध्ये आतापर्यंत ४४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ढिगाऱ्याखाली अजून ५० हुन अधिक लोक असल्याची भीती आहे.
दरम्यान, मागील दोन दिवस कोकणात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. अति मुसळधार पावसामुळे दरडी कोसळल्या आहेत. अनेक घरे या ढिगाऱ्याखाली सापडली असून अनेकांचे संसार चिखलात रुतून गेले आहेत. हजारो माणसांना आपला जीव मुठीत घेऊन सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली. अनेक ठिकाणी काल पासून दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या. ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्यांना आता बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर केलं जात आहे. मात्र, जी माणसं बाहेर काढली जात आहे, त्यांच्यात प्राणच राहिलेले नाहीत. आतापर्यंत ४४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, तब्बल ५० पेक्षा अधिक माणसं अजूनही ढिगाऱ्याखालीच असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, महाड तालुक्यातील तळीये गाव आता होत्याचं नव्हतं झालं आहे. कालपर्यंत दिसणारं उभं गाव आता स्मशानात बदललं आहे. २२ जुलैला दुपारी ४ वाजता डोंगरकडा कोसळला आणि तळीये गावातील जवळपास ३५ घरं ढिगाऱ्याखाली गाढली गेली. या ३५ घरांतील जवळपास ५० हून अधिक माणसंही ढिगाऱ्याखाली दबल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत ४४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तळीये गावातील नागरिकांचे अन्य ठिकाणी असणाऱ्याने नातेवाईकांनी गावात धाव घेतली. मात्र गावाचं रुप बघून त्यांना हंबरडाच फुटला. घरं उद्ध्वस्त झालीत, पण या घरातील माणसं गाढली गेली आहेत.








