दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप : दिवसभर चौकशी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित इतर संघटनांवर एनआयएची कारवाई सुरू आहे. एनआयए त्यांच्या सर्व ठिकाणांवर छापे टाकत आहे. उत्तर प्रदेश व्यतिरिक्त राजस्थान, महाराष्ट्र, दिल्लीसह 12 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांचाही यामध्ये समावेश आहे.
एनआयएच्या पथकाने बुधवारी पहाटे पाच वाजल्यापासून पीएफआयशी संबंधित संस्थांवर छापे टाकण्यास सुरुवात केली. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौसह सीतापूर, बहराईच, हरदोई आणि बाराबंकी या जिल्ह्यांमध्ये धाडी टाकण्यात आला. निमलष्करी दल आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह एनआयएचे पथक बुधवारी पहाटे या संघटनांच्या लपलेल्या ठिकाणी पोहोचले होते. बुधवारी दिवसभर वेगवेगळ्या भागात छापे टाकले जात होते. लखनौमदील माडेगंजमधील बडी पकारिया भागात एकाच परिसरातील तीन घरांवर एनआयएने कारवाई केली. या धाडीदरम्यान संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आला होता. संपूर्ण परिसराला सुरक्षा जवानांनी वेढा घातला होता. निमलष्करी दल आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते. उत्तर प्रदेश व्यतिरिक्त राजस्थान, महाराष्ट्र आणि दिल्लीसह सुमारे डझनभर ठिकाणी एनआयएचे छापे सुरू होते.
‘पीएफआय’वर यापूर्वीच बंदी
‘पीआयएफ’वर केंद्र सरकारने 2022 मध्ये दहशतवाद विरोधी बेकायदेशीर क्रियाकलाप कायदा म्हणजेच युएपीए अंतर्गत बंदी घातली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयवर बंदी असतानाही त्याच्याशी संबंधित या संघटना सतत देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्या असण्याची शक्मयता गृहीत धरून हे छापे टाकून संघटनेच्या हस्तकांची चौकशी केली जात आहे.









