नागामशिद-कुर्टी येथून एकाला अटक
फोंडा, मडगाव : केंद्र सरकारने बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (पीएफआय) संबंध असल्याच्या कारणावरून एका हस्तकाला नागामशिद कुर्टी येथून काल मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अटक केली असून मुफ्ती हनिफ मोहम्मद ताहीर अहरार (42, रा. नागामशिद-फोंडा) असे त्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) देशभर 17 ठिकाणी काल सोमवारी छापासत्र सुरू केले असून त्याचा हा एक भाग आहे. गोव्यातून नागामशिद-कुर्टी फोंडा येथील एका संशयिताच्या घरात छापा मारून त्याची कागदपत्रे तपासून त्याला पहाटे ताब्यात घेण्यात आले. एनआयएने ताब्यात घेतलेला मुफ्ती अहरार हा पूर्वी नुरानीमशिद कुर्टी येथे मौलाना म्हणून कार्यरत होता. नुरानी मशिदीच्या समितीने त्यांना मौलवी म्हणून सेवा बजावताना आर्थिक व्यवहारात हस्तक्षेप केल्याने हटविण्यात आले होते. तो अखिल भारतीय मौलाना परिषदेशी (एआयआयसी) काही वर्षांपासून संबंधित होता. यापूर्वी त्याने एआयआयसीचे अध्यक्षपदही भूषविले होते. सध्या तो सरचिटणीस म्हणून पदभार सांभाळीत आहे. देशातील मुस्लीम समुदायाला इस्लामिक प्रचार करण्यासाठी देशाच्या विविध भागात फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सध्या एनआयएच्या टीमने त्याच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली असून त्याला बिहार व पाटणा येथील एनआयए टीमशी चौकशीसाठी संपर्क साधण्याचे आदेश जारी केले आहे.
एनआयए टिमने संशयित म्हणून भलत्यालाच घाबरवून सोडले
संशयिताला ताब्यात घेण्यासाठी दाखल झालेल्या एनआयएच्या टिमने नुरानी मशिदीत सध्या कार्यरत असलेल्या मौलवीच्या घराचा दरवाजा ठोठावून प्रथम त्याला घाबरवून सोडले. साखरझोपेत असताना दारात हजर झालेली पोलिसांची टिम बघून त्याची तारांबळ उडाली होती. त्यानंतर शोध घेत असलेल्या संशयिताच्या मोबाईलचे सिग्नल दुसरीकडे इशारा दाखवित असल्याचे संकेत दिल्यामुळे ताब्यात घेतलेल्या मौलानाला तिथेच सोडून दिले. काही अंतरावर संशयित राहत असलेल्या भाड्याच्या खोलीकडे एनआयए टिमने मोर्चा वळविला. तेथून त्याला ताब्यात घेण्यात आले. एनआयए टिमने प्रथम रेकी करून संशयित कुठे वास्तव्यास आहे याची शहानिशा करणे गरजेचे होते अशी प्रतिक्रिया येथील स्थानिकांनी दिली आहे.
फातोर्ड्यातही एनआयचे छापे
दरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) काल मंगळवारी फातोर्ड्यातही छापे मारले. या कारवाईत नेमके एनआयएच्या हाती काय लागले याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. पीएफआयशी संबंधित काही कार्यकर्ते फातोर्डा परिसरात सक्रीय असल्याने हा छापा मारण्यात आला होता. पीएफआयचे काही कार्यकर्ते राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. हल्लीच विधानसभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अल्ताफ सय्यद हा ‘वुई फॉर फातोर्डा’ या राजकीय गटालाही निधी देत असल्याचे विधान केले होते. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले होते.
पीएफआयशी संबंधितांवरही छापे पडणार : मुख्यमंत्री
केंद्राने बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेशी एखाद्याचा संबंध असेल तर त्याच्यावरही राष्ट्रीय तपास यंत्रणेचा छापा पडेल. ही काळाची गरज आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या कट्टर राजकीय विरोधकावर ’नथीतून तीर’ मारला आहे. या प्रकरणी काहीतरी खात्रीशीर माहिती एनआयएला मिळाल्यानेच हे छापे मारले असावे. या संघटनेशी संबंध असलेल्यांवरही छापे पडणे ही काळाची गरज असून एनआयए तेही काम करेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.









