53 लाख रोख, 2 किलो सोने जप्त : नोकरीसाठी जमीन प्रकरणी कारवाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, पाटणा
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लालूप्रसाद यादव यांच्या तीन मुली आणि राष्ट्रीय जनता दल नेत्यांच्या निवासस्थानांसह 20 हून अधिक परिसरांवर छापे टाकले. तसेच लालूंचा धाकटा पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या दक्षिण दिल्लीतील घरावरही छापा टाकण्यात आला. लालूंचे मेहुणे जितेंद्र यादव यांच्या गाझियाबाद येथील निवासस्थानावरही ईडीने कारवाई केली. नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणी (लँड फॉर जॉब्स) ही कारवाई करण्यात आली असून छाप्यात 53 लाख रूपये रोख, 1,900 अमेरिकन डॉलर्स, 540 ग्रॅम सोने आणि 1.5 किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
2004 ते 2009 दरम्यान लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना त्यांच्या कुटुंबीयांना नोकरीच्या बदल्यात भूखंड भेट देण्यात आला होता किंवा त्यांना अत्यंत कमी किमतीत जमिनी देत त्याबदल्यात त्यांना रेल्वेत नोकरी देण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पुन्हा एकदा गेल्या आठवड्यापासून चौकशी आणि तपास गतिमान झाला आहे. शनिवारीही पाटणा, फुलवारीशरीफ, दिल्ली-एनसीआर, रांची आणि मुंबई येथे लालूंच्या कन्या रागिणी यादव, चंद्रा यादव, हेमा यादव आणि माजी आरजेडी आमदार अबू दोजाना यांच्या मालमत्तांवर छापे टाकण्यात आले.
सीबीआयकडून तेजस्वीला समन्स
नोकरीसाठी जमीन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानंतर सीबीआयही सक्रिय झाली आहे. तपास यंत्रणेने शनिवारी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना चौकशीसाठी समन्स पाठवत कार्यालयात येण्यास सांगितले. यापूर्वी 4 फेब्रुवारीला पहिले समन्स पाठवण्यात आले होते. सध्या पत्नीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते सीबीआयसमोर हजर होणार नाहीत. त्यांनी वेळ वाढवून मागितला आहे. ईडीच्या छापेमारीनंतर त्यांच्या पत्नीला शुक्रवारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राजकीय ‘फटकेबाजी’
छाप्याबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. आम्ही एकत्र आलो की छापेमारी सुरू होते. 2017 मध्येही तेच घडले होते आणि आता 5 वर्षांनंतरही तेच घडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच लालूप्रसाद यादव यांनीही सरकारवर संताप व्यक्त केला आहे. संघ आणि भाजपविऊद्ध माझा वैचारिक लढा असून तो यापुढेही सुरू राहील, असे ते म्हणाले. दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी शनिवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेत नितीश आणि लालूंवर निशाणा साधला आहे. लालू कुटुंबाने नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याचे सर्वश्रुत असल्याचे ते म्हणाले. तसेच नितीशकुमार हे संधीसाधू नेते असल्याचेही त्यांनी सांगितले.
ईडीने शुक्रवारी दिल्ली, मुंबई, नोएडा आणि पाटणा येथील लालू यादव यांच्या निकटवर्तीयांच्या 15 ठिकाणांवर छापे टाकले होते. लालूंचे मेहुणे जितेंद्र यादव यांच्या गाझियाबाद (यूपी) येथील निवासस्थानावर ईडीची कारवाई 16 तास चालली. शुक्रवारी सकाळी 8 वाजता सुरू झालेला तपास मध्यरात्री 12 वाजता पूर्ण झाला. तपास यंत्रणेने कागदपत्रांसह 3 मोठे बॉक्स ताब्यात घेतले आहेत. ईडीच्या 10 हून अधिक अधिकाऱ्यांनी तपास केला. कारवाईदरम्यान कुटुंबातील सर्व सदस्यांचे फोन बंद होते. लालूंचे निकटवर्तीय आणि राजदचे माजी आमदार अबू दोजाना यांच्या घरावरही ईडीने छापे टाकले. यादरम्यान ईडीच्या पथकाने सेप्टिक टँकचेही उत्खनन केले आहे. याबाबत लालूंची मुलगी रोहिणी आचार्य यांनी ईडीच्या कारवाईचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
15 मार्चला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने 27 फेब्रुवारी रोजी राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव, माजी मुख्यमंत्री आणि त्यांची पत्नी राबडीदेवी, मोठी मुलगी आणि राज्यसभा खासदार मीसा भारती यांना समन्स बजावले. जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याप्रकरणी न्यायालयाने सीबीआयच्या आरोपपत्रावर समन्स बजावले होते. ज्यामध्ये सर्वांना 15 मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.









