एसआयएकडून कारवाई : 35 वर्षे जुन्या सरला भट हत्याप्रकरणी चौकशी सुरू
वृत्तसंस्था/श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या राज्य तपास यंत्रणेने (एसआयए) मंगळवारी श्रीनगरमधील 8 ठिकाणी छापे टाकले आहेत. एप्रिल 1990 साली झालेल्या काश्मिरी पंडित असलेल्या सरला भटच्या अपहरण अन् हत्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. एसआयएने जेके लिबरेशन फ्रंटचा (जेकेएलएफ) माजी प्रमुख यासीन मलिकच्या मैसूमा येथील घरातही झडती घेतली आहे. यासीन मलिकला दहशतवादाला वित्तपुरवठा केल्याप्रकरणी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सध्या तो दिल्लीतील तिहार तुरुंगात कैद आहे. यासीनचा मुलगा गुलाम कादिर मलिक देखील तिहारमध्येच कैद आहे.
सरला भट हत्याप्रकरणाचा तपास आता एसआयए करत आहे. अलिकडेच जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी जुन्या प्रकरणांची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसारच आता काश्मिरी पंडित असलेल्या सरला भट यांच्या हत्याप्रकरणाचा तपास केला जात आहे. अनंतनाग येथील 27 वर्षीय काश्मिरी पंडित असलेल्या नर्स सरला भट या श्रीनगर येथील सौरामध्ये शेर-ए-काश्मीर आयुर्विज्ञान संस्थेत काम करत होत्या. 18 एप्रिल 1990 रोजी हब्बा खातून हॉस्टेलमधून त्यांचे अपहरण करण्यात आले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सौराच्या मल्लाबाग येथे रस्त्यावर त्यांचा मृतदेह मिळाला होता. निगिन पोलीस स्थानकात याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला होता, परंतु त्या काळातील चौकशीत गुन्हेगारांचा शोध लागला नव्हता.
हत्याप्रकरणातील संशयित
सरला भट यांच्या हत्येप्रकरणी यासीन मलिक, जावेद अहमद मीर, पीर नूर उल हक शाह, रेयाज कबीर शेख, बशीर अहमद गोजरी, फिरोज अहमद खान, कैसर अहमद टिपलू, गुलाम मोहम्मद टिपलू यांच्या ठिकाणांवर एसआयएने छापे टाकले आहेत.
कोण आहे यासीन मलिक?
1987 च्या वादग्रस्त विधानसभा निवडणुकीनंतर यासीन मलिक हा 1988 मध्ये जेकेएलएफमध्ये सामील झाला होता. 31 मार्च 1990 रोजी जेकेएलएफ प्रमुख अशफाक मजीदच्या हत्येनंतर मलिक याचा प्रमुख झाला. मलिकला ऑगस्ट 1990 मध्ये अटक करण्यात आली होती आणि त्याचवर्षी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले होते, परंतु खटल्याचे कामकाज होऊ शकले नाही. 1995 मध्ये जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने त्याच्या विरोधातील खटल्याला स्थगिती दिली. मुक्ततेनंतर मलिकने जेकेएलएफला विभागले होते. तो स्वत: कथित स्वरुपात अहिंसक फुटिरवादी गटाचा नेता झाला. तर अमानुल्लाह खानला हिंसक गटाचे नेतृत्व देण्यात आले.









