दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपती भवनात तेथील भ्रष्टाचार विरोधी पोलिसांनी छापा मारून देशात मार्शल लॉ लागू करणारे दस्ताऐवज शोधून काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. राष्ट्राध्यक्ष यून सूक येल यांनी 3 डिसेंबर 2024 रोजी रात्री 10.27 वाजता लागू केलेला मार्शल लॉ अर्थात सैन्य आणीबाणी 4 डिसेंबर रोजी पहाटे 4.30 वाजता मागे घेण्यात आली. या साडेसहा तासांच्या नाट्यामय घडामोडीनंतर तेथील पोलिसांनी संरक्षण मंत्र्यांसह पोलीस आणि लष्करी अधिकाऱ्यांची धरपकड सुरु केली आहे. तर राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभियोग ठराव दाखल झालेला आहे.
दक्षिण कोरियात राष्ट्राध्यक्ष यून सूक येल आणि नॅशनल अॅसेंब्लीत वर्चस्व राखणाऱ्या डेमोक्रेटीक पक्षात 2022 पासून बेबनाव सुरु आहे. दक्षिण कोरियातील सरकार एका विचित्र पेचात अडकलेले आहे. राष्ट्राध्यक्ष यून सूक येल 2022 साली निवडून आले. मात्र 300 सदस्यांच्या दक्षिण कोरियन संसदेत अर्थात नॅशनल अॅसेंब्लीत विरोधकांचे वर्चस्व होते. या वर्षी झालेल्या नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा नॅशनल डेमोक्रेटिक पक्षाला 192 खासदारांचे संख्याबळ प्राप्त झालेले आहे. त्यामुळे कंझर्वेटिव्ह पक्षाचे यून सूक येल हे देशाचे राष्ट्राध्यक्ष असले तरी त्यांनी मांडलेले प्रस्ताव नॅशनल अॅसेंब्लीत संमत होऊ शकत नव्हते.
राष्ट्रध्यक्ष यून सूक येल यांनी सत्ता हाती घेतल्यापासून त्यांनी सादर केलेली विधेयके संसदेत पारित होणे कठिण होऊन बसले होते. तर संसदेत बहुमताने संमत केलेली विधेयके राष्ट्राध्यक्ष यून सूक येल परत पाठवत असत. राष्ट्राध्यक्ष पदाचा ताबा 2022 मध्ये घेतल्यानंतर तब्बल 21 वेळा संसदेने संमत केलेले प्रस्ताव वेटो वापरून नाकारलेले आहेत. राष्ट्राध्यक्ष आणि नॅशनल अॅसेंब्ली यांच्यात सुरु असलेल्या ताणाताणीमुळे दक्षिण कोरियात सध्या घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झालेला आहे. या दरम्यान सरकारने मांडलेला अर्थसंकल्प 2025 नॅशनल अॅसेंब्लीत बहुमताने नाकारल्यानंतर राष्ट्राध्यक्ष येल यांचा प्रचंड जळफळाट झालेला होता. त्याचाच परिणाम म्हणून राष्ट्राध्यक्ष येल यांनी 3 डिसेंबर रोजी देशात मार्शल लॉ लागू केला.
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सूक येल यांनी मंगळवार 3 डिसेंबर रोजी रात्री 10.27 वाजता मार्शल लॉ देशात लागू करत असल्याची घोषणा केली. सरकारी दूरदर्शनवरून राष्ट्राला संबोधीत करताना सध्या देशातील नॅशनल अॅसेंब्लीत विरोधी पक्षांनी बहुमताच्या आधारे दक्षिण कोरियन सरकारला वेठीस धरलेले असून देशाचे त्यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. विरोधकांनी उत्तर कोरियातील कम्युनिस्ट पक्षाबरोबर संधान साधून दक्षिण कोरियाच्या विकासाला ते बाधक ठरत असल्याने देशात मार्शल लॉ जारी करत असल्याचे राष्ट्राध्यक्षांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. तसेच देशात मार्शल लागू करण्याबरोबरच नॅशनल अॅसेंब्ली आणि अन्य राज्यातील अॅसेंब्ली बंद करत असल्याचे स्पष्ट केले.
रात्री साडेदहा वाजता राष्ट्राध्यक्षांच्या या संबोधनानंतर दक्षिण कोरियात एकच हाहाकार माजला. देशभरातील नागरिक रस्त्यावर उतरले. तसेच त्यांनी नॅशनल अॅसेंब्लीच्या इमारतीला घेरले. डेमोक्रेटिक पक्षाच्या खासदारांनी नॅशनल अॅसेंब्लीच्या दिशेने धाव घेतली. त्यांना रोखण्यासाठी लष्कराने नॅशनल अॅसेंब्ली भोवती अभेद्य कवच निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकार विरोधी सदस्यांनी नॅशनल अॅसेंब्लीच्या इमारतीत प्रवेश केला. त्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराने आटोकाट प्रयत्न केले. यावेळी नॅशनल अॅसेंब्लीचे सदस्य आणि लष्कराच्या जवानांमध्ये झटापट पहायला मिळाली. काही ठिकाणी लष्कराच्या जवानांनी या इमारतीचे दरवाजे व भिंती तोडण्याचा प्रयत्न केला.
मार्शल लॉ देशात लागू केल्यानंतर अवघ्या अडीच तासात मध्यरात्री एक वाजता नॅशनल अॅसेंब्लीचे कामकाज सुरु झाले. संसदेच्या या आणीबाणीच्या सत्रात देशाचे राष्ट्राध्यक्ष येल यांनी देशात लागू केलेला मार्शल लॉ मागे घेण्याचा प्रस्ताव मांडला. यावेळी राष्ट्राध्यक्षांच्या समर्थक खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला. मार्शल लॉ मागे घेण्याचा ठराव 192 विरुद्ध शून्य मतांनी संमत झाला. नॅशनल अॅसेंब्लीचे इतिवृत्तांत राष्ट्राध्यक्ष येल यांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी 4 डिसेंबर रोजी पहाटे 4.30 वाजता दक्षिण कोरियातील मार्शल लॉ मागे घेत असल्याची घोषणा केली. मार्शल लॉ मागे घेतल्याच्या घोषणेनंतर रस्त्यावर उतरलेले सैन्य माघारी परतले.
दक्षिण कोरियातील या राजकीय कोंडीच्या घटनेला फेब्रुवारी 2024 पासून सुरुवात झाली होती. विरोधकांनी राष्ट्रध्यक्ष येल यांच्या पत्नी महागड्या भेट वस्तू स्वीकारून भ्रष्टाचाराला वाव देत असल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांच्या पत्नी विरोधात पोलीस तपासही सुरु होता. या तपासाला बाधीत करण्याचा राष्ट्राध्यक्षांनी अनेकवेळा प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही. अखेर त्यांनी देशात मार्शल लॉ लागू करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आता त्यांच्यावर महाभियोग ठराव आणलेला असून राष्ट्राध्यक्ष यून सूक येल यांच्या पक्षातूनही राजीनामा देण्यासाठी दबाव वाढलेला आहे.
दरम्यान, मार्शल लॉ लादण्याच्या घटनेचा पोलीस तपास नॅशनल अॅसेंब्लीच्या आदेशावरून सुरु झालेला असून थेट राष्ट्राध्यक्षांच्या सरकारी निवासस्थानावर झडती सत्र सुरु आहे. भ्रष्टाचार विरोधी पोलीस पथकाने देशाचे संरक्षणमंत्री किम योंग ह्यून व अन्य दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली. अटकेत असलेल्या किम योंग ह्यून यांनी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एकूणच देशात मार्शल लॉ लागू करण्याचा राष्ट्राध्यक्ष यून सूक येल यांचा निर्णय विफल ठरला. दक्षिण कोरियातील नागरिकांनी मध्यरात्री रस्त्यावर उतरून केलेली तीव्र निदर्शने आणि सरकार विरोधी संसद सदस्यांच्या जागरुकतेमुळे मार्शल लॉची पुनरावृत्ती यावेळी टळून गेली.
प्रशांत कामत








