लॉजच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय
कोल्हापूर : शहराच्या मध्यवर्ती कॉर्नर चौकात सुरु असलेल्या वेश्या अड्यावर सोमवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये दोन महिलांची सुटका करुन लॉज चालकास अटक केली. जयसिंग मधुकर खोत (वय २६ रा. कुंभारवाडी ता. शाहूवाडी) असे त्याचे नांव आहे. या कारवाईमध्ये रोख ९ हजार, मोबाईल असा सुमारे २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात व्हिनस कॉर्नर चौकातील व्हिनस लॉजिंगमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळाली होती.
यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या पथकाने संयुक्त पथक तयार करुन लॉजवर बनावट ग्राहक पाठविले.यावेळी या लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री होताच पथकाने कारवाई केली. यामध्ये दोन महिलांना ताब्यात घेऊन त्यांना सुधारगृहात पाठविण्यात आले.
तर लॉज चालक जयसिंग खोत याला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव, पोलीस अंमलदार सायली कुलकर्णी, तृप्ती सोरटे, प्रज्ञा पाटील, उत्तम सडोलीकर, राकेश माने, आश्विन डुणूंग, अमित मर्दाने यांनी ही कारवाई केली.
रायगड, उत्तरप्रदेश येथील महिला
या छाप्यामध्ये पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली. गेल्या सहा महिन्यापासून या महिला कोल्हापुरात असल्याचे तपासात समोर आले आहे. एक महिला रायगड येथील तर दुसरी उत्तरप्रदेश येथील आहे.








