जयपूर, बुंदी, सवाई माधोपूर, कोटा येथे संघटनेच्या अनेक सदस्यांना अटक
वृत्तसंस्था / जयपूर
टेरर फंडिंग प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) तळांवर छापे टाकले आहेत. एनआयएने शनिवारी सकाळी राजस्थानमध्ये 7 ठिकाणी कारवाई करत पीएफआय कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे टाकून अनेक सदस्यांना अटक केली. जयपूर, बुंदी, सवाई माधोपूर आणि कोटा येथे शनिवारी सायंकाळपर्यंत कारवाई सुरू होती.
एनआयएच्या टीमने या कारवाईबाबत स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती न घेता ही कारवाई केली आहे. भिलवाडा येथील गुलनगरी येथे राहणाऱया इम्रान रंगरेज याच्या घरावर एनआयएने रात्री एक वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. इम्रान रंगरेज हा एसडीपीआयचा सामाजिक कार्यकर्ता आणि पीएफआयचा माजी कार्यकर्ता आहे. एनआयएचे आणखी एक पथक पहाटे कोटा येथे दाखल झाले होते. यादरम्यान टीमने रामपुरा पोलीस स्टेशन परिसरात छापा टाकला. कोटामध्ये एकूण तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले. राजस्थानमध्ये यापूर्वीही छापे टाकण्यात आले होते. सप्टेंबर 2022 मध्ये एनआयएने पीएफआय अधिकाऱयांच्या संशयित निवासी आणि व्यावसायिक जागेवर छापे टाकत डिजिटल उपकरणे, एअर गन, धारदार शस्त्रे आणि गुन्हय़ाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्याच भागात आजही कारवाई करण्यात आली आहे. एनआयएने या छाप्यात अनेक जणांना अटक केली असली तरी कारवाईबाबत सविस्तर माहिती जारी करण्यात आलेली नाही.









