सायबर पोलिसांची कारवाई : तीन संशयितांना अटक : 11 मोबाईलसह 1 लॅपटॉप व अन्य साहित्य जप्त
प्रतिनिधी/पणजी
सायबर गुन्हा विरोधी विभागाच्या पोलिस विभागाने वास्को येथील वाडे कॉलनीत चालू असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन क्रिकेट बेटिंग रॅकेटचा यशस्वीपणे पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तीन संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून बेटिंग स्वीकारण्यासाठी वापरलेले 11 मोबाईल फोन, बेटिंग रेकॉर्ड आणि बेटिंग वेबसाईटवरील लाईव्ह अपडेट असलेले 1 लॅपटॉप. बेटिंग ऑपरेशनसाठी अनेक फोन कनेक्ट करण्यासाठी वापरले जाणारे 2 ऑडिओ मिक्सर/बेकायदेशीर टेलिकम्युनिकेशन युनिट्स (होल्ड बॉक्स) जप्त केले आहेत. संशयितांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66-क व गोवा सार्वजनिक जुगार कायदा कलम 3 व 4 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये रवींद्र कुमार शर्मा, सुनील कुमार (वय 20 वर्षे), बिरेंद्र कुमार मोंडल (वय 26 वर्षे) तिघेही संशयित बिहार येथील आहेत. वास्को भागात बेकायदेशीर क्रिकेट ऑनलाईन जुगार सुरू असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी शिताफिने कारवाई केली आणि संशयितांना रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई सायबर पोलिस विभागाचे अधीक्षक राहुल गुप्ता (आयपीएस) यांच्या देखरेखीखाली निरीक्षक दीपक पेडणेकर, उपनिरीक्षक नवीन नाईक, मंदार देसाई आणि सायबर गुन्हा विरोधी विभागाच्या इतर कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी 15 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा छापा मारून संशयितांना अटक केली आहे.
छापादरम्यान, तिघेही संशयित अनेक मोबाईल फोन, सीमकार्ड, संगणक आणि विशेष उपकरणांचा वापर करून बेकायदेशीर ऑनलाईन क्रिकेट बेटिंग करत असल्याचे आढळून आले. संशयित वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने नोंदणीकृत अनेक सीमकार्ड वापरून बेकायदेशीर क्रिकेट बेटिंग स्वीकारताना आढळून आले. संशयितांच्या ताब्यातून जप्त केलेल्या सर्व वस्तू पंचनामा अंतर्गत तपासासाठी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. सायबर गुन्हा विरोधी विभाग राज्यातील बेकायदेशीर ऑनलाईन जुगार आणि सायबर गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी वचनबद्ध आहेत. जनतेला सतर्क राहण्याचे आणि अशा कारवायांची त्वरित सायबर क्राईम हेल्पलाईनला तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









