दहा जणांना अटक, दीड लाख रुपये जप्त
► प्रतिनिधी / बेळगाव
आंबेवाडी क्रॉसजवळ (हिंडलगा) बॉक्साईट रोडवर सुरू असलेल्या एका मटका अड्ड्यावर गुरुवारी सायंकाळी छापा टाकण्यात आला. सीईएन व सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून या अड्ड्यावरून 10 जणांना अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
बेळगाव शहर व उपनगरात मटका, जुगार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी अचानक छापा टाकला. मटका अड्ड्यावर उघडपणे टेबल मांडून आकडे लिहून घेण्यात येत होते. एक ग्रा. पं. सदस्य हा अड्डा चालवतो, अशी माहिती मिळाली असून एफआयआर दाखल झाल्यानंतरच अधिक तपशील उपलब्ध होणार आहे.
गुरुवारी रात्री मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या अड्ड्यावरून 1 लाख 67 हजार रुपये रोकड व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कायेत्रात केवळ हा एकच अड्डा नव्हे तर असे अनेक मोठे अड्डे सुरू आहेत. मटका व जुगारी अड्ड्यांवर रोज लाखो रुपयांची उलाढाल सुरू आहे. तुरमुरी, बाची परिसरातही अनेक अड्डे थाटण्यात आले आहेत.
दरम्यान शहापूरच्या पोलीस उपनिरीक्षक एस. एन. बसवा यांनी जुन्या पी. बी. रोडवर मटका घेणाऱ्या अमित आनंद उंडाळे (वय 38 रा. टीचर्स कॉलनी खासबाग) या युवकाला अटक करून त्याच्याजवळून 950 रुपये रोखरक्कम व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी आणखी काही पोलीस स्थानकाच्या कायेत्रातही मटका बुकीविरुद्ध कारवाई झाली असून रात्री उशिरापर्यंत त्याचा तपशील उपलब्ध झाला नाही.









