सीईएन पोलिसांकडून सहा महिलांची सुटका
बेळगाव : अनगोळ येथील एका मसाज पार्लरवर छापा टाकण्यात आला आहे. सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून या पार्लरमध्ये काम करणाऱ्या सहा महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर पार्लरचालक महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. अनगोळ येथील मुख्य रस्त्यावर अंजली स्पा अॅण्ड ब्युटीपार्लर या नावे मसाज सेंटर चालविण्यात येत होते. यासंबंधीची माहिती मिळताच पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांच्या मार्गदर्शनाखाली सीईएनच्या पथकाने छापा टाकला. गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहा महिलांची सुटका करण्यात आली आहे.
सर्व महिला स्थानिक आहेत. स्पा आणि ब्युटीपार्लरच्या नावाने गैरप्रकार सुरू होते. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. उपलब्ध माहितीनुसार स्पामधून सुटका करण्यात आलेल्या सर्व सहा महिला विवाहित आहेत. त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्या स्थानिक असल्यामुळे त्यांनी घरी जाणे पसंत केले. मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी तीन ग्राहक होते. या प्रकरणात त्यांना साक्षीदार बनविण्यात आले आहे. अंजली स्पा अॅण्ड मसाज सेंटरच्या अंजली संजय काळे या महिलेला अटक करण्यात आली आहे. सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या कारवाईवेळी रोकडही जप्त केली आहे.









