एक मोबाईल, 4 हजार रुपये जप्त : चौघांविऊद्ध गुन्हा दाखल, ग्रामीण पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहावर शनिवारी सकाळी छापा टाकण्यात आला. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली असून छाप्यात एक मोबाईल व 4 हजार रुपये रोकड आढळली आहे. यासंबंधी चौघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त शेखर एच. टी., बेळगाव ग्रामीणचे एसीपी गोपालकृष्ण गौडर, पोलीस निरीक्षक अरुण मुरगुंडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी सकाळी 6 वाजता कारागृहात तपासणी मोहीम सुरू केली. सकाळी 8.30 पर्यंत तब्बल अडीच तास ही मोहीम चालली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद दस्तगीर ऊर्फ दास रा. बेंगळूर, शशिकांत मिसाळे, रा. सुळेभावी, सुरज केदारीचे, रा. नाझर कॅम्प-वडगाव, मडिवाळप्पा बाश्रम, रा. कुलवळ्ळी, ता. कित्तूर या चौघा जणांवर कारागृहाचे साहाय्यक अधीक्षक शहाबुद्दिन के. यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भा.दं.वि. 424, 42-बी, कारागृह दुरुस्ती कायद्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला असून पुढील तपास करण्यात येत आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना खंडणीसाठी याच कारागृहातील एका कैद्याने कॉल केला होता. त्यावेळी कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली होती. या घटनेनंतर कारागृहात तपासणी वाढविण्यात आली होती.









