कुख्यात जर्मनी गँगच्या म्होरक्यासह अकरा रेकॉर्डवरील गुन्हेगाराबरोबर सोळा जणांना अटक: शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी
इचलकरंजी / प्रतिनिधी
शहरातील हॉटेल राजदुतच्या मागे असलेल्या बोंगार्डे यांच्या राहत्या घराच्या दुस-या मजल्यावर सुरु असलेल्या अवैध तीन पत्ती जुगार क्लबवर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये मोक्याच्या गुन्ह्यातून नुकताच जामिनावर बाहेर आलेल्या शहरातील कुख्यात जर्मनी गँगच्या म्होरक्यासह अकरा रेकॉर्डवरील गुन्हेगाराबरोबर सोळा जणांना अटक केली. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह 9 हजार 610 रुपयांची रोकड, 1 लाख 12 हजार रुपये किंमतीच्या 3 दुचाकी, 77 हजाराचे 7 मोबाईल हँडसेट असा 1 लाख 98 हजार 610 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी दिली.
अटक केलेल्यांच्यामध्ये कुख्यात जर्मनी गँगच्या म्होरक्या अविनाश शेखर जाधव उर्फ जर्मनी (रा. हनुमान मंदीरा जवळ जवाहरनगर, इचलकरंजी), गुन्हेगार अमोल सुनील लोले ( रा. गल्ली क्र. 1, केटकाळेनगर, कबनूर), गुन्हेगार आकाश आण्णाप्पा भिलुगडे (रा. लिगाडे मळा, इचलकरंजी ), गुन्हेगार नौशाद करीम मुजावर, रमजान मेहबुब पकाली ( दोघे रा. स्वामी अपार्टमेंटजवळ, इंदीरा कॉलनी, इचलकरंजी ), गुन्हेगार शंकर शामराव खांडेकर ( रा. तुळजाभवानी मंदीराजवळ, तारदाळ ता. हातकणंगले ), गुन्हेगार विनायक सुभाष भंडारी ( रा. गल्ली क्र. 4 केटकाळेनगर कबनूर ), गुन्हेगार युनुस कमुद्दीन विजापुरे, सोहेल अजमेर फकीर ( दोघे रा. तक्वा मस्जीदजवळ, आवळे गल्ली, इचलकरंजी ), गुन्हेगार सिद्धरामा आनंदा पाटील ( रा. गल्ली नं. 3, हनुमाननगर, इचलकरंजी ), रणजित वजीर बागडे ( रा. इचलकरंजी ), सुनील मोहन लोले ( रा. गल्ली क्र. 1, केटकाळेनगर, कबनूर ), चंद्रकांत विनायक सोनूर ( रा. कबनूर हायस्कूलच्यामागे, कबनूर ), मुकेश बाबासाहेब कुरणे (रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कबनूर ), रामाण्णा यल्लाप्पा वडर ( रा. डेक्कन झोपडपट्टी, इचलकरंजी ) आकाश चंद्रकांत मांडवकर ( रा. पंचगंगा साखर कारखानारोड, कोरोची ) यांचा समावेश आहे.
पोलीस निरीक्षक ताशिलदार म्हणाले, शहरातील हॉटेल राजदूतच्या मागे बोंगार्डे यांच्या राहत्या घराच्या दुस-या मजल्यावर गेल्या काही दिवसापासून तीन पत्ती जुगार क्लब राजरोसपणे सुरु होता. यांची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला बातमीदाराकडून मिळाली. त्यावरून या बेकायदेशिर जुगार क्लबवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी या क्लबमध्ये शहरातील कुख्यात जर्मनी गँगच्या म्होरक्या बरोबर पोलीस रेकॉर्डवरील अकरा गुन्हेगाराबरोबर सोळा जणांना रंगेहाथ पकडून अटक केली. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह 9 हजार 610 रुपयांची रोकड, 1 लाख 12 हजार रुपये किंमतीच्या 3 दुचाकी, 77 हजाराचे 7 मोबाईल हँडसेट असा 1 लाख 98 हजार 610 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सतिश कुंभार यांनी दिली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक ताशिलदार यांनी दिली.









