कराड :
वाहनांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करून अवैधपणे गॅस भरून देणाऱ्यावर कराड शहर पोलिसांनी कारवाई करत पर्दाफाश केला आहे. विरवडे येथे संशयित अड्ड्यावर बुधवारी रात्री उशिरा छापा टाकण्यात आला. पोलिसांसोबत पुरवठा विभागाचे पथक कारवाईत सहभागी झाले होते. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरूच होती.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून या परिसरात घरगुती गॅस सिलिंडरच्या वापरातून वाहनांमध्ये गॅस भरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली संबंधित ठिकाणी पाळत ठेवून योग्य संधी साधून छापा टाकण्यात आला.
या कारवाईदरम्यान रिक्षा आणि चारचाकी वाहनांमध्ये थेट गॅस भरला जात असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी गॅस सिलिंडर, गॅस हस्तांतरणासाठी वापरण्यात येणारी उपकरणे पोलिसांनी जप्त केल्याचे समजते. मात्र अधिकृत माहिती मिळाली नाही. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामा सुरू होता. दरम्यान, संशयितांची चौकशीही सुरू असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा आणखी तपास घेतला जात आहे.
या नागरी वस्तीतील अवैध धंद्यामुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी कारवाई करत संभाव्य अपघात टाळला असला तरी यापूर्वीच ही कारवाई व्हायला हवी होती असा स्थानिकांचा सूर होता. पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कोणतीही अधिकृत नोंद करण्यात आलेली नव्हती.








