वृत्तसंस्था/ लखनौ
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी येथे लखनौ सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या दोन बलाढ्या संघामध्ये चुरशीच्या सामन्याला दुपारी 3.30 वाजता प्रारंभ होत आहे. मात्र, या सामन्यात लखनौ संघासमोर कर्णधार केएल राहुल आणि वेगवान गोलंदाज जयदेव उनादकट यांच्या दुखापतीची समस्या निर्माण झाली आहे. या स्पर्धेतील हा 45 वा सामना आहे.
सोमवारी या स्पर्धेतील बेंगळूरमध्ये झालेल्या लो स्कोअरिंगच्या सामन्यात यजमान रॉयल चॅलेजर्स बेंगळूरकडून लखनौ सुपरजायंट्सला पराभव पत्करावा लागला होता. हा पराभव ताजा असतानाच लखनौसमोर आता खेळाडूंच्या दुखापतीची समस्या नव्याने निर्माण झाली आहे. सोमवारच्या सामन्यात कर्णधार केएल राहुल शेवटच्या क्रमांकावर फलंदाजीस आला होता पण त्याला आपल्या संघाचा पराभव टाळता आला नाही. चिन्नास्वामीच्या स्टेडियमवर पावसाचा अडथळा आल्यानंतर गोलंदाजीला अनुकूल ठरलेल्या खेळपट्टीवर दोन्ही संघांकडून भक्कम फलंदाजी होऊ शकली नाही. लखनौने बेंगळूरला 126 धावात रोखल्यानंतर बेंगळूरने लखनौला 108 धावा गुंडाळून थरारक विजय मिळवला. गेल्या रविवारी नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करताना उनादकटला दुखापत झाली होती. केएल राहुल आणि उनादकट यांच्या दुखापतीचे स्वरुप अद्याप समजू शकलेले नाही. त्यामुळे बुधवारच्या सामन्यात राहुल आणि उनादकट यांचा संघामध्ये समावेश होईल किंवा नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. लखनौ संघातील मेयर्स, पुरन, स्टोईनिस आणि कृणाल पांड्या यांच्यावरच फलंदाजीची प्रामुख्याने भिस्त राहिल. कर्णधार केएल राहुलने पंजाब किंग्ज विरुद्ध 74 तर गुजरात जायंट्स विरुद्ध 68 धावा जमवल्या होत्या. ही दोन अर्धशतके वगळता राहुलची फलंदाजी बहरलेली दिसत नाही. लखनौ संघाची 2023 च्या आयपीएल हंगामातील कामगिरी हेलकावे खात आहे. काही सामन्यामध्ये त्यांची कामगिरी निश्चितच दर्जेदार झाल्याचे जाणवते पण काही सामन्यामध्ये त्यांच्या खराब कामगिरीमुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 28 एप्रिल रोजी पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात लखनौ संघाची सांघिक कामगिरी निश्चितच दर्जेदार झाली होती तर सोमवारच्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात त्यांची सर्वात खराब कामगिरी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. बुधवारच्या सामन्यात केएल राहुल खेळण्याची शक्यता दुरावली आहे. राहुलच्या गैरहजेरीत धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्जचा संघ बुधवारच्या सामन्यात निश्चितच आक्रमक पवित्रा घेईल असा अंदाज आहे. लखनौने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 9 सामन्यातून 10 गुणासह तिसरे स्थान मिळवले आहे. चेन्नई सुपरकिंग्जचा संघ 10 गुणासह सरस धावसरासरीच्या आधारे चौथ्या स्थानावर आहे. आता चेन्नई आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर यांच्यात गुणतक्त्यात वरचे स्थान मिळवण्यासाठी कडवी चुरस राहिल.

चेन्नई सुपरकिंग्जला या स्पर्धेत गेल्या दोन सामन्यात सलग पराभव पत्करावे लागले होते. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या संघांनी चेन्नईचा पराभव केला होता. आता बुधवारच्या सामन्यात चेन्नईचा संघ लखनौवर विजय मिळवून पुन्हा मुसंडी मारण्यासाठी प्रयत्न करेल. लखनौ संघासमोर दुखापतग्रस्त खेळाडूंची समस्या निर्माण झाल्याने त्याचा लाभ चेन्नईचा संघ निश्चितच घेईल. चेन्नईचा सलामीचा फलंदाज न्यूझीलंडचा देवॉन कॉन्वे याची फलंदाजी चांगलीच बहरली असून त्याने आतापर्यंत या स्पर्धेत 9 सामन्यात 59.14 धावांच्या सरासरीने 414 धावा जमवताना 144.25 स्ट्राईकरेट राखला आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात कॉनवेने नाबाद 92 धावा झोडपल्या असतानाही चेन्नईला पराभव पत्करावा लागला होता. चेन्नईच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, शिवम दुबे आणि कॉनवे यांच्यावर राहिल. महीश तीक्षणा आणि पथिरना हे लंकेचे गोलंदाज बऱ्यापैकी कामगिरी करत असून त्यांना मोईन अली , दीपक चहर आणि जडेजा यांची साथ मिळत आहे.
चेन्नई सुपरकिंग्स : एमएस धोनी (कर्णधार), कॉनवे, आकाश सिंग, ऋतुराज गायकवाड, रायडू, मोईन अली, स्टोक्स, जडेजा, अजिंक्य रहाणे, सिसांदा मगाला, शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, अजय मंडल, निशांत सिंधू, राजवर्धन हंगरगेकर, मिचेल सँटनर, एस. सेनापती, सिमरजीत सिंग, पथिराना, तीक्षना, भगत वर्मा, प्रशांत सोळंकी, शेख रशीद, तुषार देशपांडे, दीपक चहर.
लखनौ सुपर जायंट्स : के. एल. राहुल (कर्णधार), आवेश खान, आयुष बदोनी, डी. कॉक, के. गौतम, गुलेरिया, दीपक हुडा, पी. मंकड, मेयर्स, अमित मिश्रा, मोहसिन खान, नवीन उल हक, कृणाल पंड्या, पुरन, रवी बिश्नोई, सॅम्स, कर्ण शर्मा, आर. शेफर्ड, स्टोईनिस, स्वप्नील सिंग, उनादकट, व्होरा, मार्क वूड, यश ठाकूर आणि युधवीर सिंग.
सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वाजता









