कोल्हापूर प्रतिनिधी
मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्या जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची हकालपट्टी करावी. येत्या दहा दिवसात त्यांची बदली झाली नाही तर राज्य सरकारला मराठ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा सकल मराठा समाज, कोल्हापूरच्या शिष्टमंडळाने सोमवारी येथे दिला. कोल्हापूरातील शासकिय विश्रामगृह येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकार्यांच्या अँटीचेंबरमध्ये मराठा आंदोलकांसोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी रेखावार यांनी मराठ्यांना आरक्षण मिळाले तर दंगल होईल, जाळपोळ होईल असे विधान केले होते. परंतु, हे प्रकरण चिघळल्यानंतर दि. 22 ऑगस्टला झालेल्या बैठकीमध्ये असे काही घडलेच नाही, पुरावा द्या, असे आव्हान सकल मराठा समाजाला दिले. त्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री केसरकर यांच्यासोबत बैठक झाली.
बैठकीत दि. 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी यांच्या अॅटी चेंबरमध्ये झालेल्या बैठकीला उपस्थित असणारे सांगली येथील सकल मराठा समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी सर्व वृत्तांत सांगितला. जिल्हाधिकारी रेखावार यांनी आक्षेापार्ह वक्तव्य केल्याचे पालकमंत्र्यांसमोर सांगितले. त्या दिवशी बैठकीला आपल्यासह मराठा आंदोलक देसाई, माउली सावंत, निकम, बाबर यांनी जिल्हाधिकारी रेखावार यांना जाब विचारला होता, असेही स्पष्ट केले.
बैठकीत मराठा आंदोलकांनी जिल्हाधिकारी रेखावार यांनी पदभार स्विकारल्यापासून, आमदार, लोकप्रतिनिधी, पत्रकार, वकील बंधु कशा पध्दतीने उध्दट वर्तणूक केली याचा पाढाच वाचला. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करवीर तालुक्यातील एका गावातील जमिनीसंदर्भात दिलेला एक महत्वपूर्ण आदेशही जिल्हाधिकार्यांनी धडकावून लावल्याचे यावेळी सांगण्यात आले. अशा मनमानी कारभार करण्राया सनदी अधिकार्यास महाराष्ट्रातील 30 टक्के मराठा समाजाला लाथाडून, जवळ करणार आहात का? असा खडा सवालही विचारला. तसेच पालकमंत्र्यांनी अशा वादग्रस्त अधिक्रायांची पाठराखण केल्यास येण्राया भविष्यकाळात राज्य सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असा सज्जड इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला.
यावर पालकमंत्री केसरकर यांना मराठा आंदोलकांच्या भावना त्वरीत मुख्यमंत्र्यांना कळविल्या जातील, त्यानंतर व्यापक हिताचा निर्णय होईल, असे आश्वासन दिले.
यावेळी सकल मराठा समाजाचे अॅड. बाबा इंदूलकर, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष विजयसिंह पाटील-उत्तरेकर, माजी अध्यक्ष अॅड. शिवाजीराव राणे, अॅड. सतिश नलवडे, आर. के. पोवार, दिपक जाधव, बाबा पार्टे, किशोर घाटगे, रूपाराणी निकम, पद्मावती पाटील, संगिता खाडे, सर्जेराव साळोखे, राजू भोसले, बाबा पाटील, अमर निंबाळकर, माणिक पाटील-चुयेकर, महादेव पाटील, अमर शेणेकर, सुजाता पाटील, तेजस्विनी पार्टे, रुपाली तोडकर, अविनाश दिंडे, सचिन चौगुले, अनिल शिंदे, उदय भोसले, आदी उपस्थित होते.
त्वरीत मराठा आरक्षणप्रश्नी मुंबईत बैठक घ्यावी
यावेळी आंदोलकांनी मे 2021 मध्ये मराठा आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे काही परिच्छेद वाचून दाखविले. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्ग सुचीमधील प्रगत झालेल्या जाती वगळ्याण्याची व नविन मागास जाती समावेश करण्याची सुचना केली आहे. असे असताना अद्याप शासन व महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग काहीच करताना दिसत नाही. यामुळे मराठा समाजाची पुन्हा एकदा शासन फसवणूक करत आहे. तरी ही समाजाची फसवणूक थांबवून उपमुख्यमंत्री पवार यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे मुंबईमध्ये त्वरित बैठक घ्यावी, तसेच व महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग कायदा- 2005 चे कलम 11 ची अंमलबजावणी त्वरित सुरू करावी, अशी विनंती आंदोलकांनी पालकमंत्र्यांकडे केली.









