संभल जाण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी : लढत राहू असे काढले उद्गार
वृत्तसंस्था/ गाझीपूर
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका वड्रा यांचे उत्तरप्रदेशातील संभल येथे जाण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. पोलिसांनी गाझीपूर सीमेवरच त्यांचा वाहन ताफा रोखल्याने त्यांना दिल्लीत परतावे लागले आहे. हिंसाप्रभावित संभलमध्ये 10 डिसेंबरपर्यंत बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. तर बंदी असूनही राहुल गांधी हे संभल येथे जात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊ पाहत होते.
आम्ही संभल येथे जाण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु पोलिसांनी अनुमती नाकारली आहे. विरोधी पक्षाचा नेता म्हणून तेथे जाण्याचा मला अधिकार आहे तरीही पोलीस मला रोखत आहेत. मी एकटाच जाण्यास तयार आहे, पोलिसांसोबत जाण्यास तयार आहे असे सांगितले तरीही मला अनुमती नाकारण्यात आली. काही दिवसांनी आलो तर आम्हाला प्रवेश दिला जाईल असे पोलीस सांगत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
आम्ही केवळ संभल येथे जाऊ इच्छितो, लोकांना भेटू इच्छित आहोत, तेथे काय घडले हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. मला माझ्या घटनात्मक अधिकारांपासून रोखले जात आहे. हा नवा भारत आहे. हा राज्यघटना नष्ट करणारा भारत आहे, आम्ही लढत राहू असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांचा घटनात्मक अधिकार त्यांना मिळायला हवा. अशाप्रकारे त्यांना रोखले जाऊ शकत नाही. पीडितांना भेटण्याची अनुमती त्यांना दिली जावी. पोलीस याप्रकरणी काहीही उत्तर देऊ शकले नाहीत असा दावा प्रियांका वड्रा यांनी केला आहे.
अखिलेश यादव यांचे आरोप
प्रशासनाने भाजपच्या इशाऱ्यावर संभल येथे हिंसा घडवून आणली आहे. कुठल्याही पक्षाच्या नेत्याला तेथे जाऊ दिले जात नाही. प्रशासन नेमकं काय लपवू पाहत आहे? लोकशाहीत अधिकाऱ्यांना अशाप्रकारचे वर्तन करण्याची अनुमती दिली जाऊ शकते का? 10 डिसेंबरपर्यंत प्रशासन काय काय लपविणार आणि किती दडपणार हेच कळत नाही. उत्तरप्रदेशात भाजप केवळ लोकांना अडकविण्याचे काम करत आहे, न्याय मिळवून देण्याचे नाही असा आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे.
सत्य दडपण्याचा प्रयत्न
प्रशासन कुठेतरी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे. याचमुळे आतापर्यंत स्थिती सुरळीत झालेली नाही. जर कुठलेही शिष्टमंडळ पीडितांना जाऊन भेटले तर सत्य समोर येईल हे भाजप सरकारला ठाऊक आहे, याचमुळे जितका विलंब होईल, तितकेच भाजपसाठी उपयुक्त ठरणार असल्याचा दावा सप खासदार डिंपल यादव यांनी केला आहे. सरकारला नेमकी कशाची भीती आहे. देशात काय घडतेय हे पाहण्याचा अधिकार विरोधी पक्षनेत्या आहे. संभलमध्ये जे काही घडले ते दुर्दैवी आहे. लोकांची हत्या झाली, त्याला कोण जबाबदार? विरोधी पक्षनेत्याला घटनास्थळी जाण्यापासून रोखले तर हा मुद्दा ते संसदेत कसा उपस्थित करणार? राहुल गांधी हे संभलला जातील अणि पीडित कुटुंबीयांना भेटून त्यांचा आवाज उपस्थित करतील असे काँग्रेस नेते अजय कुमार लल्लू यांनी म्हटले आहे.
संभलमध्ये तणाव ओसरला
सुमारे 10 दिवसांपूर्वी संभलच्या जामा मशिदीत होत असलेल्या सर्वेक्षणादरम्यान हिंसा झाली होती. समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक करत जाळपोळ केली होती. या हिंसेदरम्यान 4 जणांचा मृत्यू झाला होता. तर स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी इंटरनेट सेवा रोखण्यात आली होती. तर दुसरीकडे बाहेरील लोकांच्या शहरातील प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. अशा सितीत वाहनांच्या तपासणीसोबत संशयित लोकांची झडती घेतली जात आहे.









