वृत्तसंस्था/ प्रयागराज
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह भगिनी खासदार प्रियांका गांधी रविवार, 16 फेब्रुवारी रोजी महाकुंभात स्नान करतील. काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या आगमनाचा कार्यक्रम जवळजवळ निश्चित झाला आहे. राहुल आणि प्रियांका संगमात स्नान केल्यानंतर पूजाही करतील. यादरम्यान 1000 काँग्रेस कार्यकर्ते स्नान करू शकतात. यापूर्वी 11 फेब्रुवारी 2021 रोजी प्रियांका गांधी प्रयागराजला आल्या असताना त्यांनी संगमस्नान केले होते. तसेच 2019 च्या अर्धकुंभमेळ्यावेळीही प्रियांका यांनी संगमात स्नान केले होते.
राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या प्रयागराज भेटीपूर्वी काँग्रेस नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. संगम किनाऱ्यावरील सेक्टर 15 मधील तुलसी मार्गावर काँग्रेस सेवा दलाने महाकुंभ सेवा शिबिर उभारले आहे. या शिबिरात राहुल आणि प्रियांका काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांना भेटतील. तसेच, महाकुंभात सेवा दलाकडून केल्या जाणाऱ्या सामाजिक आणि धार्मिक कार्याची माहिती देण्यात येईल.









