कटृर काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यापासून चार हात दूरच राहणार आहेत
By : राजू घाटगे
भोगावती : प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्यापासून राष्ट्रीय काँग्रेसशी निष्ठा जपलेले आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे विश्वासू सहकारी मित्र म्हणून माजी आमदार पी. एन. पाटील यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील यांचा राष्ट्रवादी (अजित पवार) गटातील प्रवेश निश्चित झाला आहे.
यामुळे करवीर व राधानगरी तालुक्यासह भोगावती साखर कारखाना परिसरातील आगामी राजकारणाच्या बदलापेक्षा पक्षीय पातळीवरील समीकरणे बदलणार आहेत. मात्र पी. एन. पाटील यांची काँग्रेस पक्षनिष्ठेची परंपरा यानिमित्ताने खंडित होणार हे निश्चित आहे.
कॉंग्रेस पक्ष बदलाच्या प्रयत्नांना पाटील बंधूंना करवीर तालुक्यातील पी. एन. प्रेमी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून येते. तर कटृर काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यापासून चार हात दूरच राहणार आहेत. राधानगरी तालुक्यातील केवळ राशिवडे व कसबा तारळे या दोन जि. प. मतदारसंघात काहीसा फरक जाणवणार आहे. मात्र उर्वरित राधानगरी तालुक्यात याचा परिणाम दिसणार नाही.
यामुळे काँग्रेसची संघटना मात्र जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या पाठीशी एकवटली आहे. ती यापूर्वी राधानगरी, भुदरगड विधानसभेच्या तीन निवडणुकीत विस्कटलेली दिसत होती. राधानगरी तालुक्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची मते आजमावण्यासाठी घेतलेल्या मेळाव्यात पक्षबदल प्रवेशाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
करवीर तालुक्यातील काँग्रेसची ताकद कमी झाली असली तरीही उरलेली कॉंग्रेस एकसंघ दिसणार आहे. मात्र पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या राजकारणात बदल दिसणार आहे. येथील काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लागणार असून परिणामी महायुतीची सत्ता येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र करवीर तालुक्यातील 100 टक्केपैकी 70 टक्केच काँग्रेस पाटील बंधूंच्या सोबत राष्ट्रवादी पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे.
परिणामी राजकीय गटांची ताकद जैसे थे राहणार असून पक्षीय पातळीवर बदल जाणवणार आहेत. तरीही विधानसभेला पाटील विरुद्ध नरके परंपरागत लढत काँग्रेस ऐवजी राष्ट्रवादी व शिवसेनेत झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र करवीर विधानसभा अंतर्गत गगनबावडा तालुक्यात याचा परिणाम होणार नाही.
तेथील कॉंग्रेस, शिवसेना शिंदे गटासह भाजप आपली ताकद टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहतील. करवीर तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद पाटील बंधूंच्या प्रवेशामुळे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पी. एन. गटाची ताकद त्यांना दाखवावी लागेल.
अजित पवार राष्ट्रवादीचा करवीर तालुक्यात दबदबा वाढणार आहे. दर विधानसभा निवडणुकीत फरफटत जाणारी राष्ट्रवादी यावेळी विधानसभेसह जिल्हा बँक, गोकुळ, मार्केट कमिटी, जिल्हा परिषद व पंचायत समितीवर वरचष्मा गाजवणार आहे.
याच तालुक्यात असलेल्या मात्र करवीर व राधानगरी तालुक्यात विभागलेल्या भोगावती कारखाना सत्तेत यावेळी काही बदल जाणवणार नाही. कारण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व संचालक हिंदुराव चौगले व रविंद्र पाटील सोबत नसले तरीही कारखान्यात ते एकत्रितच राहतील. मात्र येथील काँग्रेसची ताकद कमी दिसणार असून राष्ट्रवादीला आता जोश येणार आहे.
पूर्वीच्या सांगरुळ विधानसभा मतदारसंघात असल्याने काँग्रेसचे आमदार श्रीपतराव बोंद्रे यांचे राधानगरी तालुक्यातील पूर्वी राशिवडे व कौलव जिल्हा परिषद मतदार संघावर वर्चस्व होते. त्यांच्यापासून पी. एन. घराणे काँग्रेसशी जोडले गेले. बोंद्रे यांच्याशी जावयाचे नाते असल्याने हाच वारसा पुढे पी. एन. यांच्याकडे आला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांच्याशी त्यांचा मित्रत्वाचा संबंध होता. तरीही पी. एन. यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिलीच. हीच सल पी. एन. पाटील गटाच्या मनात कायम राहिल्याने पक्ष बदलाचे हे मुख्य कारण मानले जाते. राधानगरी तालुक्यातील पाचपैकी राशिवडे व कसबा तारळे, भोगावती साखर कारखाना संलग्न मतदारसंघातील गावात पी. एन. गटाचे राजकीय वजन आहे. तोच गट सोबत राहणार आहे. मात्र धामोड व म्हासुर्ली भागात परिणाम जाणवणार नसल्याचे दिसून येते.








