संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ समाप्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ 15 सप्टेंबर रोजी संपुष्टात आला आहे. आता ईडीचे विशेष संचालक राहुल नवीन यांना ईडीचे अंतरिम संचालक म्हणून नियुक्त केले जाणार आहे. संजय कुमार मिश्रा यांनी सुमारे 4 वर्षे 10 महिन्यांपर्यंत ईडीचे संचालक म्हणून काम पाहिले होते.
राहुल नवीन हे 1993 च्या तुकडीचे आयआरएस अधिकारी आहेत. राहुल नवीन हे विशेष संचालक असण्यासह ईडीच्या मुख्यालयात मुख्य दक्षता अधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत. नव्या संचालकाची औपचारिक नियुक्ती होत नाही तावर अंतरिम संचालक म्हणून ते जबाबदारी सांभाळणार आहेत.
संजय कुमार मिश्रा यांना 2018 मध्ये ईडीचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2020 मध्ये संपणार होता, परंतु केंद्र सरकारकडून त्यांना तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. या निर्णयावर विरोधी पक्षांनी टीका केली होती तसेच सर्वोच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान दिले होते.
संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ वाढविण्यासाठी सीव्हीसी अधिनियमात दुरुस्तीही करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने जुलै महिन्यात मिश्रा यांच्या तिसऱ्या मुदतवाढीला अवैध ठरविले होते. तसेच न्यायालयाने त्यांना 15 सप्टेंबरपर्यंतच पदावर राहण्याची अनुमती दिली होती.









