उत्तरप्रदेश काँग्रेस अध्यक्षांचे विधान ः वाद निर्माण होण्याची शक्यता
वृत्तसंस्था / लखनौ
काँग्रेसचे उत्तरप्रदेशातील नवनियुक्त अध्यक्ष बृजलाल खाबरी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा रविवारी केला आहे. यावेळी खाबरी यांनी राहुल गांधी यांचे कौतुक करताना ‘राहुलचा अर्थ भारत आणि भारताचा अर्थ राहुल असा असल्याचे म्हटले आहे.
खाबरी यांची ही टिप्पणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष देवकांत बरुआ यांचा प्रसिद्ध नारा ‘इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया’ची आठवण करून देणारी आहे. बरुआ यांच्या या टिप्पणीवर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठविली होती. याचमुळे खाबरी यांची ही टिप्पणी आता वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांनी देशाला वाचविण्यासाठी कंबर कसली असून लाखो लोक त्यांच्यासोबत चालत आहेत. राहुल म्हणजे भारत आणि भारत म्हणजे राहुल असे मी म्हणू शकतो. भाजपने कितीही प्रयत्न केले तरीही त्याचे उमेदवार रायबरेली आणि अमेठीत स्वतःची अनामत रक्कम वाचवू शकणार नाहीत. उत्तरप्रदेशातील सर्व लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचे काँग्रेसचे लक्ष्य असल्याचे उद्गार खाबरी यांनी काढले आहेत.









