फॅब चषक फुटबॉल स्पर्धा: सिग्नेचरला डिसाईडरने रोखले
बेळगाव : फॅब स्पोर्टस क्लब आयोजित अमोदराज स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत पॅब चषक निमंत्रितांच्या आंतर क्लब फुटबॉल स्पर्धेतील विविध सामन्यात राहुल के आर शेट्टी संघाने रॉ फिटनेसचा, भारत एफसीने केआर शेट्टी किंग्ज्सचा पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळवले. सिग्नेचर संघाला डिसाईडर एफसीने संघाने बरोबरीत रोखले. सी आर सेव्हन स्पोर्ट्स एरियाना टर्फ फुटबॉल मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात सिग्नेचर स्पोर्ट्स क्लबला डिसाईडर एफसीने 1-1 असे बरोबरीत रोखले. या सामन्यात सातव्या मिनिटाला सिग्नेचरच्या अल्तमस जमादारच्या पासवर अतिफ मुजावरने गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
10 व्या मिनिटाला जमादारने गोल करण्याची नामी संधी दवडली. दुसऱ्या सत्रात 21 व्या मिनिटाला डिसाईडर एफसीच्या अनिकेतच्या पासवर राहुलने गोल करून 1-1 अशी बरोबरी करीत सामन्यात रंगत निर्माण केली. 27 व्या मिनिटाला डिसाईडरच्या अनिकेतने गोल करण्याची नामी संधी दवडली. 20 व्या मिनिटाला आसिफ मुजावरने मारलेला फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला शेवटी हा सामना बरोबरीत राहिला. दुसऱ्या सामन्यात राहुल के आर शेट्टी संघाने रॉ फिटनेसचा 6-0 असा मोठा पराभव केला. या सामन्यात चौथ्या व नव्या मिनिटाला राहुल के आर शेट्टी संघाच्या नदीमच्या पासवर अनासने सलग दोन गोल करून 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. 13 व्या मिनिटाला अनासच्या पासवर नदीमने गोल करून पहिल्या सत्रात 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 22 व्या मिनिटाला रॉ फिटनेसच्या सुफियान सय्यदने गोल करण्याची संधी दवडली. 24 व्या मिनिटाला
प्रांजलच्या पासवर अनासने चौथा गोल केला. 27 व्या मिनिटाला नदीमच्या पास वर इकलालने पाचवा गोल केला. तर 29 व्या मिनिटाला अनासच्या पासवर प्रांजलने सहावा गोल करून 6-0 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात रॉ फिटनेस संघाला गोल करण्यात अपयश आले. तिसऱ्या सामन्यात भारत एफसीने के आर शेट्टी किंग्ज्सचा 2-1 असा निसटता पराभव केला. या सामन्यात 12 व्या मिनिटाला भारत एफसीच्या ओमकार मन्नूकरच्या पासवर तेजसने गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवली. 19 व्या मिनिटाला के आर शेट्टी किंग्ज्सच्या जयेश सांबरेकरच्या पासवर अझलानने गोल करून 1-1 अशी बरोबरी करीत पहिल्या सत्रात रंगत निर्माण केली. दुसऱ्या सत्रात 33 व्या मिनिटाला ओमकारच्या पासवर जयदेवने गोल करून 2-1 असे महत्त्वाचे आघाडी मिळवून दिली. 38 व्या मिनिटाला केआर शेट्टी किंग्जच्या किरण निकमने गोल करण्याची नामी संधी दवडली, आणि पराभवास सामोरे जावे लागले.









