विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : खाडे कुटुंबिय फरार असल्याचे समोर आले
सांगली प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागामध्ये तत्कालिन शाखा अभियंता असणाऱ्या राहूल विठ्ठल खाडे, रा. रामकृष्ण परमहंस सोसायटीचे जवळ, जगदाळे प्लॉट, पोळमळा सांगली यांनी भ्रष्टमार्गाने एक कोटीची संपत्ती जमा केल्याचे लाचलुचपतच्या अहवालात सिध्द झाले आहे. त्यानुसार राहूल खाडे, त्याच्या पत्नी सौ. सरोजिनी खाडे, मुलगी विशाखा खाडे यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान राहूल खाडे हे कुटुंबासहित फरार असल्याचेही समोर आले आहे. खाडे यांनी अपसंपदा धारण केल्याबाबत सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागात वर्ग दोनचे अधिकारी असणाऱ्या तत्कालिन शाखा अभियंता राहूल विठ्ठल खाडे यांनी भ्रष्ट व गैरमार्गाचा अवलंब कऊन संपत्ती मिळविली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज लाचलुचपत प्रतिबंधक विभागास प्राप्त झाला होता. या प्राप्त तक्रारी अर्जाचे अनुषंगाने राहुल खाडे यांचे मालमत्तेची उघड चौकशी करण्यात आली होती. यामध्ये शाखा अभियंता राहूल विठ्ठल खाडे, त्यांची पत्नी सौ. सरोजिनी राहुल खाडे व त्यांची मुलगी विशाखा राहूल खाडे यांनी दि. 7 नोव्हेंबर 1989 ते दि. 28 फेब्रुवारी 2015 या परिक्षण कालावधीत त्यांना मिळालेल्या उत्पन्न स्त्रोताच्या विसंगत प्रमाणात एक कोटी, दोन लाख, एकशे तेरा, ऊपये ही अधिक संपत्ती मिळविली आहे. ती संपत्ती त्यांच्या उत्पन्नाच्या (93 टक्के) इतकी अपसंपदा आणि भ्रष्ट मार्गाने धारण केल्याचे या उघड तपासात निष्पन्न झाले आहे.
राहूल खाडे यांनी भ्रष्ट व गैरमार्गाने कमवलेली अपसंपदा धारण करण्यास त्यांची पत्नी सौ. सरोजनी राहूल खाडे व त्यांची मुलगी विशाखा राहूल खाडे यांनी त्यांना प्रोत्साहन दिले असल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाल्याने राहूल विठ्ठल खाडे, त्यांची पत्नी सौ. सरोजिनी राहूल खाडे व मुलगी विशाखा राहूल खाडे यांच्याविरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये विश्रामबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
राहूल खाडे आणि त्यांच्या पत्नी फरार असल्याचे समोर
राहूल विठ्ठल खाडे व त्यांची पत्नी सौ सरोजनी राहूल खाडे यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाणे जि. सांगली येथे 12 जुलै 2010 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. सदर गुह्यांतून ते व त्यांची पत्नी जामिनावर मुक्त झाल्यापासून ते व त्यांचे कुटुंबीय फरारी असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली.