प्रतिनिधी/ बेळगाव
राज्य युवा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी राहुल जारकीहोळी यांची निवड झाली आहे. प्रथमच बेळगाव जिल्ह्याला युवा काँग्रेसचे सरचिटणीसपद मिळाले असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी चन्नम्मा चौक परिसरात विजयोत्सव साजरा केला. मिठाई वाटून व फटाक्यांची आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी बोलताना मलगौडा पाटील म्हणाले, यमकनमर्डी विधानसभा व चिकोडी लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत राहुल जारकीहोळी यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी पूर्ण करून यशस्वी झाले होते. आता 1 लाख 20 हजार मतांच्या अंतराने ते युवा काँग्रेसच्या सरचिटणीसपदावर विजयी झाले आहेत. या निवडणुकीत त्यांच्या विजयाची खात्री होती, असेही मलगौडा पाटील यांनी सांगितले.
यावेळी बोलताना प्रदीप एम. जे. म्हणाले, राहुल जारकीहोळी यांनी प्रथमच पक्षांतर्गत निवडणुकीत अत्याधिक मताधिक्याने विजय मिळवून इतिहास निर्माण केला आहे. इतर उमेदवारांच्या तुलनेने तीनपट अधिक मते त्यांना मिळाली आहेत. भविष्यात पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यावेळी पुढील मुख्यमंत्री सतीश जारकीहोळी अशा घोषणा दिल्या.









