पोलीस खात्यातील जबाबदारी सांभाळून चमक : वेळोवेळी मिळतेय पोलीस खात्याचे सहकार्य
दापोली तालुक्यातील मांदिवली या छोट्या गावातून सुरू झालेला एक प्रवास आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. राहुल मोहन इंदुलकर या जिद्दी आणि परिश्रमी खेळाडूने बॉडिबिल्डींग व आर्म रेसलिंग क्षेत्रात अद्वितीय कामगिरी केली आहे. मुंबईमध्ये ताडदेव पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून सेवा बजावत असलेल्या राहुल यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाची नवी शिखरे गाठत बॉडीबिल्डिंग आणि आर्मरेसलिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर मोठं यश मिळवून महाराष्ट्राचं व देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे.
कोरोना काळ ठरला टर्निंग पॉईंट
खेळाची आवड आणि कोरोना काळातील संघर्ष हा एका सामान्य कुटुंबातून आलेल्या राहुल यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. लहानपणापासूनच राहुल यांना खेळाची प्रचंड आवड होती. शाळा व महाविद्यालयीन जीवनात त्यांनी कब•ाrमध्ये आपलं कौशल्य दाखवलं होतं. परंतु त्यांच्या आयुष्यात एक मोठा ‘टर्निंग पॉइंट’ आला तो म्हणजे कोरोना महामारी. या काळात त्यांनी आपल्या वडीलांना गमावलं आणि याचवेळी तपासणीत त्यांना शुगर असल्याचं समजलं. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि स्वत:ला शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यासाठी त्यांनी व्यायामाची कास धरली. या निर्णयामुळे राहुल यांच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली. व्यायामावर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता वाढली आणि त्यांना बॉडीबिल्डिंग व आर्म रेसलिंग करिअर करण्याची प्रेरणा मिळाली.
2022पासून यशोगाथेला प्रारंभ
बॉडीबिल्डिंगमधील प्रवास आणि यशाची गाथा सन 2022 पासून सुरू झाली. राहुल यांनी बॉडीबिल्डिंगच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. आतापर्यंत त्यांनी 25 ते 30 हून अधिक पदके मिळवली आहेत. त्यांचा हा प्रवास अनेक पदकांनी सजलेला आहे. 2022 मध्ये नवी मुंबई आणि पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धांमध्ये रौप्य पदक, तर मुंबई श्री बॉडीबिल्डिंगमध्ये सुवर्ण पदक पटकावले. याच वर्षी रत्नागिरी येथे महाराष्ट्र श्री बॉडीबिल्डिंगमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. 2023 मध्ये हरियाणा येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस आर्मरेसलिंग स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवला. त्याचबरोबर, मुंबई पोलीस बॉडीबिल्डिंगमध्ये रौप्य आणि मुंबई श्री बॉडीबिल्डिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकले. 2024 मध्ये चिपळूण येथे महाराष्ट्र श्री बॉडीबिल्डिंगमध्ये कांस्य पदक, तर जुहू येथे महाराष्ट्र हरक्यूलिस स्पर्धेतही कांस्य पदक मिळवले. याशिवाय लालबाग विकास श्री बॉडीबिल्डिंग आणि मुंबईतील इनक्लिंग फिटनेस आर्मरेसलिंग स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. याच वर्षी लखनऊ येथे अखिल भारतीय पोलीस आर्मरेसलिंग स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवला. 2024 अखेर अमरावती येथे झालेल्या 36व्या महाराष्ट्र राज्य आर्मरेसलिंग स्पर्धेत 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावून त्यांनी आपल्या यशात भर घातली. 2025 मध्ये त्यांनी मुंबई श्री बॉडीबिल्डिंगमध्ये कांस्य पदक जिंकले, तर केरळमध्ये झालेल्या ओपन ऑल इंडिया आर्मरेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये 2 कांस्य पदके मिळवली.
भारतीय संघात निवड…
राहुल यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा क्षण म्हणजे नुकतीच बंगळूर येथे झालेली मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धा. या स्पर्धेत त्यांनी रौप्य पदक पटकावले. या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ही त्यांच्यासाठी आणि देशासाठी अभिमानाची बाब आहे. पोलीस दलातील सन्मान आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी मिळत आहे. पोलीस खात्यात आपल्या कामासोबतच खेळातील या यशाबद्दल मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि मुंबई पोलीस कर्मचारी पगारदार सहकारी पतसंस्थेच्या वतीने राहुल यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. पोलीस उपआयुक्त कृष्णकांत उपाध्याय आणि ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी त्यांना विशेष प्रोत्साहन दिले आहे. राहुल इंदूलकर यांच्या या प्रवासात प्रो फिटनेस जिम ताडदेवचे संस्थापक हेमंत अरुण दुधवडकर व सबरेझ मुकादम यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच जिम मार्गदर्शक व आहारतज्ञ सिध्देश खानविलकर आणि जिम प्रशिक्षक हबीब शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर गुरुवारी हरियाणामध्ये झालेल्या ऑल इंडिया पोलीस क्लष्टर गेम मध्ये आपली चमक दाखवली.
व्यायाम जीवनाचा अविभाज्य भाग असावा
“शारीरिकदृष्ट्या मजबूत असलेला माणूस कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकतो. व्यायामामुळे शरीरासोबत मानसिक बळही मिळते. आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायाम हा जीवनाचा अविभाज्य भाग असावा. कोविडच्या काळात व्यायामाचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवले आणि याच व्यायामाने मला नवी दिशा दिली, अशी प्रतिक्रिया राहुल इंदुलकर यांनी दिली.
“ तरुणांसाठी आदर्श”
राहुल इंदुलकर यांचा प्रवास हा जिद्दीचा, आत्मविश्वासाचा आणि कठीण परिस्थितीतही हार न मानण्याचा आदर्श आहे. आपल्या वडीलांना गमावूनही त्यांनी जीवनात नवी उमेद निर्माण केली. आज ते अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. त्यांच्या यशामुळे दापोलीसह संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडूंना नवी दिशा मिळाली आहे. राहुल इंदुलकर यांची ही कहाणी हे दाखवते की संकटे आयुष्यात येतातच; परंतु त्यावर मात करण्याची तयारी आणि मनाची ताकद असेल तर यश आपल्या दाराशी येते. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
– प्रतिक तुपे, दापोली









