मणिपूरमधील हिंसेचा केला उल्लेख
वृत्तसंस्था/ आयजोल
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी मिझोरामच्या आयजोल येथे पोहोचून एका जाहीर सभेला संबोधित केले आहे. या सभेत बोलताना राहुल यांनी मणिपूरमधील घटनांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. या सभेनंतर राहुल यांनी 5 किलोमीटर लांब पदयात्रेत भाग घेतला आहे.

राहुल यांनी चानमारी येथून पदयात्रेला प्रारंभ करत ट्रेझरी स्क्वेयरपर्यंत भाग घेतला आहे. यावेळी त्यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला. राहुल यांनी स्वत:च्या या दौऱ्याद्वारे मिझोराम येथील तरुणाईला काँग्रेसच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. मिझोरामची निवडणूक जाहीर झाली असून राज्यात सत्तेवर येण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे.
काही महिन्यांपूर्वी मी मणिपूर येथे गेलो होतो. भाजपने मणिपूरचा विचार संपविला आहे. आता हे एक राज्य नसून दोन राज्ये झाली आहेत. लोकांच्या हत्या करण्यात आल्या असून महिलांवर अत्याचार करण्यात आले, तरीही पंतप्रधानांना तेथे दौरा करणे महत्त्वपूर्ण वाटत नसल्याची टीका राहुल यांनी केली आहे.
छोट्या आणि मध्यम व्यवसायांना उद्ध्वस्त करण्यासाठी जीएसटी आणला गेला आहे. तसेच तो भारताच्या शेतकऱ्यांना कमकुवत करण्यासाठी लागू करण्यात आला आहे. नोटाबंदीचे काय झाले हे सर्वजण जाणतात. पंतप्रधान मोदींच्या कल्पनेमुळे देशाला मोठे नुकसान सहन करावे लागले. नोटाबंदीच्या धक्क्यानंतर देशाची अर्थव्यवस्था आजतागायत सावरली नसल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.
भारताची अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी पंतप्रधानांच्या रणनीतिला समजून घेण्याची इच्छा असल्यास केवळ ‘अदानी’ या शब्दात समजता येते. सर्वकाही एका उद्योजकाच्या मदतीसाठी निर्माण करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेत्याने केला आहे.
राहुल गांधी हे आयजोल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी पक्षनेत्यांना भेटणार आहेत तसेच एका पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. तसेच लुंगलेई शहरात एका सभेला ते संबोधित करतील. त्यानंतर ते अगरतळा मार्गे दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.
40 सदस्यीय मिझोराम विधानसभा निवडणुकीसाठी 7 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होईल. राज्यात सत्तारुढ असलेल्या मिझो नॅशनल फ्रंट आणि मुख्य विरोधी पक्ष जोराम पीपल्स मूव्हमेंटने स्वत:चे सर्व 40 उमेदवार यापूर्वीच घोषित पेले आहेत. तर काँग्रेसने राज्यातील सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे.









