वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जनगणनेसोबतच जातीय जनगणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘हे काँग्रेसचे व्हिजन असून ते सरकारने स्वीकारले आहे’ असे ते म्हणाले. तसेच राहुल गांधी यांनी तेलंगणातील काँग्रेस सरकारने केलेल्या जात सर्वेक्षणाचे मॉडेल म्हणून वर्णन करत ते राष्ट्रीय पातळीवर राबविण्यासाठी एक ब्लूप्रिंट म्हणून वापरण्याची मागणी केली. “आम्ही या निर्णयाचे समर्थन करतो. पण ही जातीनिहाय जनगणना कधी आणि कशी लागू होणार हे जाणून घेऊ इच्छितो. तेलंगणा हे एक मॉडेल बनले असून ते ‘ब्लू प्रिंट’ बनू शकते. आम्ही जातीय जनगणनेची रचना करण्यात सरकारला पूर्ण मदत करू,” असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या जातीय जनगणनेच्या निर्णयाचे वर्णन काँग्रेसच्या मोहिमेचे परिणाम असल्याचे सांगितले. सरकारने घेतलेला निर्णय हा आमच्या मोहिमेचा परिणाम आहे. आम्ही यापूर्वी संसदेत जातीय जनगणनेबाबत भाष्य केले होते, असेही ते पुढे म्हणाले. त्याव्यतिरिक्त सामाजिक न्याय अधिक मजबूत करण्यासाठी आरक्षणावरील 50 टक्के मर्यादा काढून टाकण्याची मागणी त्यांनी उपस्थित केली. समाजातील सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल यावर राहुल गांधी यांनी भर दिला.









