काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी पदयात्रा घेऊन चालले आहेत. महाराष्ट्रात ती तब्बल 14 दिवस चालेल. प्रदेश काँग्रेससाठी फार वर्षांनी काहीतरी वेगळे, चांगले घडत आहे. पक्ष सावरणे, मित्र दृढ करणे ही त्यांना संधी आहे.
काँग्रेस केंद्रात आणि राज्यात सत्तेवर होती तेव्हाही जितका वेळ दिला नाही, तेवढा आता राहुल गांधी महाराष्ट्राला देणार आहेत. दक्षिण भारतातील स्वागत स्वीकारत तेलंगणाच्या वाटेने ते नांदेड जिह्यातील देगलूर येथे 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश करतील. 21 तारखेपर्यंत महाराष्ट्रात फिरतील. प्रत्येक पंचवीस किलोमीटरवर ते सभेला किंवा कार्यकर्त्यांना संबोधित करतील. महाराष्ट्र काँग्रेसची ही यात्रा लोकांपर्यंत पोहोचवण्याची धडपड सुरु आहे. ज्या नांदेड आणि हिंगोलीने पहिल्या मोदी लाटेतसुद्धा खासदार विजयी केले तिथे नांदेडमध्ये पाच आणि हिंगोलीत चार दिवस यात्रा फिरेल. नवव्या दिवशी वाशिम, अकराव्या दिवशी अकोला आणि तेराव्या दिवशी बुलढाणा करुन 14 व्या दिवशी ते महाराष्ट्रातून बाहेर पडतील. तसे पाहिले तर गुजरातपेक्षाही महाराष्ट्राने त्यांना सतत यश दिले आहे. गुजरातमध्ये सत्तेबाहेर पडून 28 वर्षे झाली. महाराष्ट्रातील आमदार संख्या गुजरातच्या निम्म्यावर आली असली तरी ती राज्याच्या सर्व भागात आहे. काँग्रेसच्या 40 घराण्यांना इथल्या जनतेने सावरले आहे. अडीच वर्षे सत्तेची लॉटरीही लागली. पण असंख्य नेते असताना महाराष्ट्र काँग्रेसकडे एकमुखी नेतृत्व नाही, ही राहुल गांधी यांची खंत आहे. शरद पवारांना विरोध या एका मुद्यावर अनेक नेत्यांची भिस्त असते. मात्र आता पवारांच्यापेक्षा भाजप विरोधावर नेत्यांनी लक्ष केंद्रित करावे, हा राहुल गांधींनी संदेश पोहोचवला आहे. बऱयाच नेत्यांनी पवारांशी जुळवून घेतले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगली आणि कोल्हापूर जिह्यात डॉ. विश्वजीत कदम आणि सतेज पाटील यांनी राहुल गांधी यांच्या पदयात्रेचे लाईव्ह दर्शन लोकांना व्हावे यासाठी दिवसा गावोगावचे आठवडा बाजार आणि सायंकाळी छोटय़ा, मोठय़ा गावांच्या मुख्य चौकात यात्रा आणि सभेचे प्रसारण दाखवण्यास सुरुवात केली आहे. असाच काहीसा प्रयोग साताऱयात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नगर जिह्यात बाळासाहेब थोरात यांच्याकडून सुरू आहे. त्यामुळे उर्वरित राज्यातील नेतेही हालचाल करु लागले आहेत. विदर्भाच्या पट्टय़ात विशेषतः नागपुरात काँग्रेसला पुन्हा प्रतिसाद मिळत असल्याने नितीन राऊत, नाना पटोले या नेत्यांनी वेग घेतला आहे. स्वागताला मित्रपक्ष हजर राहतील का नाही? अशी शंका माध्यमांना आहे. मात्र खुद्द राहुल गांधी यांच्या भोवती निर्माण होत असलेले वलय लक्षात घेता त्यापासून दूर राहणे शिवसेना आणि राष्ट्रवादीला शक्मय नाही. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे सामील होण्याची, चालण्याची शक्मयता आहेच. दवाखान्यातून बाहेर पडल्यानंतर ज्ये÷ नेते शरद पवार स्वतःच या यात्रेशी सभेच्या किंवा भेटीच्या रूपाने का होईना जोडून घेतील. इतर नेतेही हमखास दिसतील. उर्वरित महाराष्ट्राच्या जिह्यातून काँग्रेस कार्यकर्त्यांना या यात्रेत सामील करून चालण्याचे नियोजन महिनाभर आधी झाले आहे. त्यामुळे प्रत्येक जिह्यातील आपल्या नेत्यांची शक्ती आणि त्यांचे संघटन कितपत आहे, याचा पुरेसा अंदाज प्रदेश काँग्रेस बरोबरच राहुल गांधी यांनासुद्धा येणार आहे. गावोगावी कार्यकर्ताही चार्ज होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी घोषणापत्रातील लोकप्रिय बाबीच लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत, हे वास्तव जाणून राहुल गांधी यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. गुजरात निवडणुकीत काँग्रेसने 500 रुपयात गॅस सिलेंडर देण्याचे सुतोवाच केले आहे. त्याची चर्चा गुजरातपेक्षाही महाराष्ट्रात अधिक होईल. अर्थातच या संधीचे रूपांतर काँग्रेस नेते कसे करतात त्यावर फलित अवलंबून असेल.
ठाकरे-फडणवीस जुगलबंदी, शिंदे शांत!
राज्यातील उद्योग गुजरातला गेल्याच्या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यातील जुगलबंदी महाराष्ट्राने पाहिली. देवेंद्र फडणवीस यांच्या अभ्यासाचा धसका महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी घेतला आहे. त्यामुळे गेली पावणेआठ वर्षे त्यांच्या खुलासेवार बोलण्यानंतर चर्चा थांबायची. मात्र आदित्य ठाकरे यांनी त्यांना तगडे आव्हान उभे केल्याचे या आठवडय़ात दिसून आले. ठाकरेंच्या खुलासेवार पत्रकार परिषदेनंतर दुसऱया दिवशी उद्योग मंत्री उदय सावंत यांना सारवासारव करावी लागली. महाराष्ट्रातून गुजरातला चाललेले उद्योग आणि सुरतला चाललेला हिरे उद्योग ही भाजपच्या दृष्टीने डोकेदुखीची बाब आहे. निवडणूक असल्याने गुजरातच्या घोषणा वाढणार आणि चटके महाराष्ट्रात बसणार हे जाणून गुजरातच्या निवडणुका लवकर संपणार याचा सर्वाधिक आनंद त्यांना झाला असेल. आता पंतप्रधानांनी केलेल्या सव्वा दोन लाख कोटी रुपये प्रकल्प कामांच्या विषयाला ढाल करून पुढचे 38 दिवस त्यांना तग धरायचा आहे. मुंबई महापालिकेची कॅग चौकशी हा शिवसेनेसाठीही असाच डोकेदुखीचा विषय आहे. संजय राऊत यांची लवकर सुटका झाली तर इतरांना धीर येईल, शिवाय शिरसाट, सरनाईक वगैरे मंडळी सत्तेत अधिक दुखावतील याकडे त्यांची नजर लागली आहे. राणा आणि बच्चू कडू प्रकरण पेटते की विझते याकडे आता दुर्लक्ष होईल. मात्र या काळात कमालीचे शांत राहिलेले, गावातील शेतात रमलेले मुख्यमंत्री शिंदे भाजपमधील नेत्यांच्या पोटात गोळा उठवणारा विषय बनला आहे. एकतर त्यांच्या मंत्र्यांना काही करायला मोकळीक आहे. त्यांचे आमदार तोंडसुखही घेऊ शकतात आणि आम्हाला मात्र तोंड दाबून बुक्क्मयांचा मार सुरु आहे, ही त्यांची भावना आहे. भाजपसोबत आणलेल्या पूर्वीच्या पक्ष, संघटनांच्या नेत्यांना जिल्हास्तरीय सत्तेत वाटा द्यायचा नाही म्हणून भाजपचे अनेक पालकमंत्री ताणून धरत असताना शिंदे गटाचे नेते थेट मुख्यमंत्र्यांची भीती पालकमंत्र्यांना घालू लागले आहेत. त्यामुळे आपल्या मनासारखे होणार की नाही? याची या भाजप नेत्यांना चिंता आहे. हे त्रांगडे सोडवणे कठीण जात आहे. त्यात एकनाथ शिंदे अमित शहा यांचे फेवरेट बनत आहेत. हा सगळाच मामला त्रासदायक ठरू लागला आहे. शिवाय ते निस्तरण्यासाठीही प्रयत्न करुन शत्रूत्व ओढवून घ्यावे लागत असल्याची अस्वस्थता भाजपमध्ये जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पांडुरंगाला हात जोडताना फडणवीस यांच्या मनात काय भावना असेल?
शिवराज काटकर








