केंद्र सरकारची टीका, अमेरिकेशी भरभक्कम संबंध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दम असेल, तर त्यांनी अमेरिपेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप खोटारडे आहेत, हे लोकसभेत स्पष्ट करावे, हे राहुल गांधी यांनी केलेले विधान वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. संसदेत, आंतरराष्ट्रीय संबंधांवर अशी भाषा करणे असमंजसपणाचे आहे, अशी टीका केंद्र सरकारच्या ज्येष्ठ सूत्रांनी केली आहे. राहुल गांधी यांचे विधान ते अद्याप राजकीय ‘पौगंडावस्थे’त असल्याचे दर्शवून देणार आहे, असे या सूत्रांनी वृत्तसंस्थांशी संवाद करताना स्पष्ट केले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष मी थांबविला, असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी वारंवार केले आहे. त्याचा संदर्भ घेत राहुल गांधी यांनी पहलगाम हल्ला आणि ‘सिंदूर अभियान’ यांच्यावरील संसदेतील महाचर्चेत हे विधान केले होते. हे विधान केवळ आश्चर्यकारक आहे असे नाही, तर ते वस्तुस्थितीलाही धरुन नाही, असे केंद्र सरकारच्या वतीने प्रतिपादन करण्यात आले.
कोणाचीही मध्यस्थी नाही
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सशस्त्र संघर्ष पाकिस्तानने विनंती केल्यावरुन थांबविण्यात आला, ही वस्तुस्थिती आहे. भारताने वारंवार ही स्थिती स्पष्ट केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी अनेकदा यासंबंधी वक्तव्ये केली आहेत. भारताने कोणाचीही मध्यस्थी स्वीकारलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकसभेत भाषण करताना, ‘आमच्यावर ‘सिंदूर अभियान’ थांबवा, असा दबाव कोणत्याही नेत्याने आणला नव्हता, असे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडात जी-20 परिषदेत भाग घेण्यासाठी गेले असताना त्यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा झाली होती. त्यावेळीही त्यांनी ट्रंप यांना ‘सिंदूर अभियाना’चा घटनाक्रम आणि पाकिस्तानच्या विनंतीवरुनच हा संघर्ष कसा स्थगित ठेवण्यात आला, या बाबींची माहिती दिली होती. ट्रंप यांनी या शस्त्रसंधीसंबंधात कोणतीही विधाने केली असली, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या संसदेत ट्रंप खोडारडे आहेत, असे विधान करावे, अशी अपेक्षा करणे या राजकीय प्रौढत्वाचे लक्षण मानता येणार नाही, असे या सूत्रांचे म्हणणे आहे.
अमेरिकेशी संबंध दृढ
भारताचे अमेरिकेशी दृढ आणि सखोल संबंध आहेत. ते दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहेत. काही वर्षांपूर्वी भूतान नजीकच्या डोकलाम येथे भारत आणि चीन यांच्या सेनांमध्ये संघर्षाची स्थिती उद्भवली होती. त्यावेळी अमेरिकेने भारताला ठामपणे पाठिंबा दिला होता, ही बाब विसरता येणार नाही. काही विधानांमुळे असे संबंध बिघडत नसतात, असेही प्रतिपादन या सूत्रांनी केले आहे.
सरकारला कोंडीत पकडण्यासाठी..
ट्रंप खोटारडे आहेत असे म्हणा, हे राहुल गांधींचे वादग्रस्त विधान केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी केले असावे, असा अर्थ लावला जात आहे. तथापि, अशा आव्हानांमुळे आंतरराष्ट्रीय संबंध धोक्यात येऊ शकतात. परिणामी, अशी विधाने करताना परिस्थितीचे भान राखावे, असेही मत व्यक्त होत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आणली स्पष्टता
लोकसभेत मंगळवारी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थतेसंबंधीची स्थिती स्पष्ट केली होती. त्यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या दूरध्वनीचा घटनाक्रम स्पष्ट केला होता. पाकिस्तान ‘मोठा हल्ला’ करण्यासाठी सज्ज होत आहे, असा संदेश देण्याचा व्हान्स यांचा प्रयत्न होता. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, हल्ले थांबविण्यास नकार देत, पाकिस्तानने दु:साहस केल्यास त्याला अधिक मोठा दणका देऊ असे व्हान्स यांच्याकडे स्पष्ट केले होते. कोणाचीही मध्यस्थी स्वीकारलेली नाही, हेही त्यांनी दर्शवून दिले होते त्यामुळे या विषयावर पडदा पडला आहे, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.









