यात्रा बिहारच्या हद्दीत प्रवेश करणार
वृत्तसंस्था/ कोलकाता
दोन दिवसांच्या विश्र्रांतीनंतर रविवारी दुपारी अडीच वाजता काँग्रेसची न्याय यात्रा पुन्हा पश्चिम बंगालमधील जलपैगुडी येथून निघाली. 25 जानेवारीला ही यात्रा आसाममधून पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यात दाखल झाली होती. येथे रोड शो केल्यानंतर राहुल नवी दिल्लीला रवाना झाले होते. त्यानंतर रविवारी दुपारी ते पुन्हा मूळ स्थानी दाखल झाल्यानंतर यात्रेला पुन्हा प्रारंभ झाला आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमधून सुरू झालेली ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सध्या पश्चिम बंगालमध्ये आहे. रविवारी राहुल गांधी यांनी सुरुवातीच्या टप्प्यात पदयात्रा काढल्यानंतर सिलिगुडी येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. आता ही यात्रा बिहारच्या हद्दीत प्रवेश करणार असून पुन्हा पश्चिम बंगालमध्ये जाणार आहे. या यात्राकाळात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सहभागी करून घेण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.