कोल्हापूर :
काँग्रेसचे नेते आणि लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना शहरी नक्षलवादी आणि अराजकवादी शक्तींनी घेरले आहे. भारत जोडो समूहामध्ये सहभागी झालेल्या ज्या संघटना आहेत त्या अतिशय एक्सट्रीम डाव्या विचारायचे आहेत ते आता काँग्रेस विचारसरणीचे राहिलेले नाहीत, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. भारतीय संविधानाची प्रत पारंपारिक निळ्या रंगातील कव्हरमध्ये असते. राहुल गांधी भारतीय संविधानाची प्रत लाल रंगातीलच कव्हर घातलेलीच का दाखवतात, असा सवालही त्यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, आता राहुल गांधी यांची विचारसरणी काँग्रेसची राहिलेली नाही. ते आता डाव्या अतिरेकी विचारसणीचे झाले आहे. भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता परवणाऱ्या लोकांना एकत्र करून समाजात विद्वेष निर्माण करण्याचं काम याठिकाणी होत आहे. अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नाही, अर्बन नक्षलवादाचा अर्थ असा आहे की लोकांची मन प्रदूषित करायची त्यांच्यामध्ये अराजकता रोपण करायचं, जेणेकरून देशातील संस्था, सिस्टीम यांच्यावरचा त्यांचा विश्वास उडेल.
देशाच्या एकतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण होईल हेच काम अराजकतेला पसरवण्याचे काम राहुल गांधींच्या माध्यमातून होत आहे. नागपूर येथे राहुल गांधी यांच्या संविधान कार्यक्रमावेळी माध्यम प्रतिनिधींच्या उपस्थितीवर बंदी घालण्यात आली होती. ते गुप्त बैठकाचे आयोजन करत लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या माध्यमांना त्या बैठकांपासून लांब ठेवतात, असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.








