कोल्हापूर :
संसदेचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत खासदारांना धक्काबुक्की करत गुंडागर्दी केली. धक्काबुक्कीने काही होत नाही, असे वक्तव्य करत त्यांनी धक्काबुक्की केल्याचे अप्रत्यक्ष कबुल केले. संसदेच्या आवारात यापूर्वी अशी घटना कधीच घडली नाही. राहुल गांधी आखाड्यात आहात का, अशी विचारणा करत भाजपचे माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी धक्काबुक्कीचा निषेध केला. कोल्हापूर दौऱ्यावर आलेले माजी मंत्री जावडेकर यांनी शासकीय विश्रामगृह येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राहुल गांधीसह काँग्रेसवर टीका केली.
माजी मंत्री जावडेकर म्हणाले, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेला आखाडा समजत खासदारांना धक्काबुक्की करत जखमी केले. त्यांची ही गुंडागर्दी लोकशाहीसाठी घातक आहे. आखाड्यालाही काही नियम असतात पण राहुल गांधी यांच्या कृतीतून काँग्रेसच्या आखाड्यात कोणतेच नियम नसल्याचे दिसून येत आहे. पराभव झोंबल्याने काँग्रेसकडून केवळ गदारोळ घालण्याचे काम सुरु आहे. पण जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. आता इंडिया आघाडीतील घटक पक्षही काँग्रेसला नाकारत आहेत. त्यामुळे काँग्रेसने पराभवाचे आत्मपरिक्षण करावे, अन्यथा काँग्रेस वाढण्याऐवजी रसातळाला जाईल, असे माजी मंत्री जावडेकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, विरोधक एक देश एक निवडणुकीला विरोध करत आहेत. पण मतदाराला स्वत:च अस मत आहे, त्यानुसार तो मतदान करत असतो. 1999 मध्ये महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र झाली. यामध्ये एकाच दिवशी मतदान होऊनही लोकसभेला भाजपला 40 तर विधानसभेला 30 टक्के मतदान मिळाले. यावरुन मतदार सुज्ञ आहे हे सिद्ध होते. त्यामुळे मतदारांवर अविश्वास न दाखवता चांगले काम करा. झालेल्या पराभवातून काहीच शिकण्याची मानसिकता विरोधकांची नाही. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याच्या भीतीपोटी एक देश एक निवडणुकीला विरोध सुरु असल्याची टीका जावडेकर यांनी केली.
ईव्हीएमबाबात बोलताना जावडेकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशावेळी, ज्या राज्यात सत्ता मिळाली तिथे ईव्हीएम चांगले. जिथे पराभव झाला तिथे मात्र ईव्हीएमवर शंका उपस्थित करायची. ईव्हीएम हॅक करता येत नाही. ईव्हीएममुळे निवडणुक प्रक्रीयेला गती मिळाली. ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्याऐवजी निवडणुकीत पराभव का झाला याची कारणे विरोधकांनी शोधणे आवश्यक असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, महिला जिल्हाध्यक्ष रुपाराणी निकम, गायत्री राऊत, संगीता खाडे, राजसिंह शेळके आदी उपस्थित होते.








