निवडणूक आयोग ‘फॅक्टचेक’मधून स्थिती स्पष्ट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगावर केलेले आरोप फारसे अर्थपूर्ण नाहीत, हे आयोगाने केलेल्या सत्यचाचणीत स्पष्ट होत आहे. भारतीय जनता पक्षानेही या संदर्भात सत्यपरीक्षण केले आहे. गांधी यांच्या आरोपात फारसे तथ्य नाही, असे या पक्षाचे प्रतिपादन आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर ‘मत चोरी’चा आरोप केला होता.
गांधी यांनी धादांत खोटे आरोप केले आहेत असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. बेंगळूर मध्य लोकसभा मतदारसंघातील एक महादेवपुरा विधानसभा क्षेत्र वगळता इतर सर्व सात विधानसभा क्षेत्रांमध्ये काँग्रेसला मताधिक्क्य मिळाले होते, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता. तथापि, या मतदारसंघातील आठपैकी चार विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपचे उमेदवार पी. सी. मोहन हे आघाडीवर होते, असे निवडणूक आयोगाने आकडेवारीसह दर्शविले आहे. तसेच या लोकसभा मतदारसंघातील मुस्लीम बहुल भागात बनावट आणि डुप्लिकेट मतदार ओळखपत्रांचे प्रमाण पुष्कळ अधिक आहे. हा भाग प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीशी राहिलेला दिसून येतो. मग राहुल गांधी यांनी या वस्तुस्थितीचा उल्लेख त्यांच्या पत्रकार परिषदेत का केला नाही, असाही प्रश्न भारतीय जनता पक्षाने उपस्थित केला आहे. ज्या भागांमध्ये भारतीय जनता पक्षाला मताधिक्क्य मिळाले होते, तेथेच केवळ निवडणूक ‘चोरण्या’त आली आहे असे गांधी यांचे म्हणणे आहे काय, असा प्रतिप्रश्नही विचारण्यात आला आहे. गांधी यांना त्यांच्या तथाकथित पुराव्यांसंबंधी एवढा विश्वास आहे, तर त्यांनी निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास का नकार दिला, असाही प्रश्न विचारण्यात आला आहे.









