वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांचे दिल्लीतील निवास्थान बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ते आता दक्षिण दिल्लीतील निझामुद्दिन पूर्व ब 2 या वस्तीत रहावयास जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. अवमानना प्रकरणात त्यांना गुजरातमधील न्याय दंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवून 2 वर्षांची शिक्षा काही महिन्यांपूर्वी दिली होती. त्यामुळे नियमानुसार त्यांना आपले खासदारपद गमवावे लागले होते. त्याचप्रमाणे त्यांना सरकारी निवासस्थान सोडण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यांनी सरकारी निवासस्थान सोडून अन्यत्र निवास केला होता.
ते ज्या नव्या निवासस्थानी जाणार आहेत, ते निवासस्थान दिल्लीच्या माजी आणि दिवंगत मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याही निवासाचे स्थान होते. त्या या निवासस्थानी 1991 ते 1998 अशी सात वर्षे राहिल्या होत्या. 2015 नंतर त्या पुन्हा याच निवासस्थानात रहात होत्या. सध्या राहुल गांधी आपल्या आई सोनिया गांधी यांच्या समवेत त्यांच्या सरकारी निवासस्थानात रहात आहेत.
राहुल गांधी यांनी त्यांचे सरकारी निवासस्थान सोडल्यानंतर काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना त्याची घरे देण्याची तयारी दर्शविली होती. दिल्लीतील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनीही त्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केले होते. तथापि, आता त्यांच्या निवासाचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे.









