पंजाबमध्ये पोहोचली काँग्रेसची भारत जोडो यात्रा
वृत्तसंस्था / अमृतसर
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मंगळवारी पंजाबमध्ये पोहोचली आहे. हरियाणाच्या अंबाला येथून अमृतसर येथे पोहोचून राहुल गांधी यांनी सुवर्णमंदिरात प्रार्थना केली आहे. पगडी परिधान पेलेल्या राहुल गांधींसोबत यावेळी पंजाबमधील विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
मंगळवारी दुपारी राहुल गांधी सुवर्णमंदिरात दाखल झाले, तेथे प्रार्थना केल्यावर काही काळ त्यांनी कीर्तन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. ब्ल्यू स्टार ऑपरेशननंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंबाचा एखादा सदस्य सुवर्णमंदिरात कीर्तन ऐकण्यासाठी तेथे थांबला होता. सुमारे 20 मिनिटांपर्यंत कीर्तन करत असलेल्या सिंघ-साहिबानांच्या मागे राहुल गांधी बसून होते.
व्हीआयपी ट्रीटमेंट नाही
राहुल गांधी यांच्याभोवती तीन स्तरीय सुरक्षा असली तरीही त्यांच्यासोबत एसजीपीसीचा कुठलाच सदस्य तसेच सुरक्षा कर्मचारी नव्हता. काही क्षणांसाठी रांगेतील लोकांना रोखून राहु गांधी यांना आत जाऊ देण्यात आले. ब्ल्यू स्टार ऑपरेशननंतर गांधी कुटुंबाला सुवर्णमंदिरात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात नाही.
हरियाणानंतर पंजाबमध्ये
काँग्रेसची भारत जोडो यात्रा यापूर्वी हरियाणाच्या दुसऱया टप्प्यात होती मंगळवारी सकाळी भारत जोडो यात्रेची सुरुवात हरियाणाच्या अंबालामधून झाली होती. मंगळवारी दुपारनंतर भारत जोडो यात्रेने शंभू बॉर्डरमार्गे पंजाबमध्ये प्रवेश केला.
हिमाचल अन् जम्मू-काश्मीरमध्ये जाणार
भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये 7 दिवस चालणार आहे, त्यानंतर ही यात्रा हिमाचल प्रदेशात पोहोचणार आहे. मग यात्रा जम्मू-काश्मीरसाठी रवाना होईल. परंतु जम्मू-काश्मीरला रवाना होण्यापूर्वी पंजाबच्या पठाणकोटमध्ये एका विशाल सभेचे आयोजन केले जाणार आहे. या सभेला राहुल गांधी संबोधित करणार आहेत. 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकविण्यासह या यात्रेचा समारोप केला जाणार आहे.









