निवडणुकीत विजयासाठी प्रार्थना, तीन दिवसांचा उत्तराखंड दौरा
वृत्तसंस्था/ केदारनाथ
काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी तीन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर पोहोचले आहेत. वैयक्तिक दौऱ्यावर असलेले काँग्रेस खासदार राहुल गांधी रविवारी दुपारच्या सुमारास जॉली ग्रँट विमानतळावर पोहोचले. तेथून ते थेट केदारनाथ धामकडे रवाना झाले. केदारनाथ धाम येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी देवदर्शनावेळी त्यांनी निवडणुकीत विजयासाठी प्रार्थना केली. केदारनाथ दर्शनानंतर राहुल गांधी संध्याकाळच्या आरतीला उपस्थित राहिले. तसेच त्यांनी महाभिषेक पूजाही केल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आर. सी. तिवारी यांनी सांगितले.
राहुल गांधी दुपारी केदारनाथ धाम येथील व्हीआयपी हेलिपॅडवर पोहोचले. याठिकाणी स्थानिक नागरिक आणि तीर्थक्षेत्राच्या पुजाऱ्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी सैफ हाऊसमध्ये थोड्या विश्र्रांतीसाठी रवाना झाले. विश्र्रांतीनंतर संध्याकाळी बाबा केदारनाथ यांचे दर्शन घेतले. आता ते केदारनाथमध्येच रविवार आणि सोमवारी रात्री मुक्काम करणार आहेत. रविवारी त्यांच्यासाठी केदारनाथमधील गढवाल मंडल विकास निगमचे गेस्ट हाऊस बुक करण्यात आले आहे. मंगळवार, 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 च्या सुमारास केदारनाथ धाम येथून परतण्याचा त्यांचा विचार आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीने इंटरनेट मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये राहुल गांधींच्या बाबा केदारनाथ दर्शन कार्यक्रमाचे वर्णन त्यांचा वैयक्तिक आध्यात्मिक प्रवास असल्याचे स्पष्ट केले आहे.









