हिंडेनबर्ग अहवालावरील वक्तव्यामुळे भडकली खासदार
वृत्तसंस्था/ शिमला
हिमाचल प्रदेशच्या मंडी येथील खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना धोकादायक ठरविले आहे. राहुल गांधी हे देशाला उद्ध्वस्त करू पाहत आहेत. देशातील वित्तीय संस्थांच्या विरोधात कट रचणाऱ्या हिंडेनबर्ग रिपोर्टचे राहुल गांधी हे समर्थन करत आहेत. परंतु हा अहवाल आता फुसका बार ठरला असल्याचा दावा कंगना यांनी केला आहे.
राहुल गांधी हे देशाची सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेला अस्थिर करू पाहत आहेत. राहुल गांधी यांनी आयुष्यभर विरोधी पक्षात बसण्याची तयारी करावी. देशाची प्रगती, विकास आणि राष्ट्रवाद पाहून राहुल गांधी त्रस्त होत आहेत. आमच्या शेअरबाजाराला लक्ष्य करणाऱ्या हिंडेनबर्ग रिपोर्टचे राहुल गांधी समर्थन करत असल्याचा आरोप कंगना यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी रविवारी एका व्हिडिओ संदेशात हिंडेनबर्ग रिपोर्टसंबंधी चिंता व्यक्त केली होती. त्यांनी सेबी प्रमुख माधवी बुच यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विरोधी पक्षनेता म्हणून भारतीय शेअरबाजारात एक मोठी जोखीम असल्याचे लोकांच्या निदर्शनास आणून देणे हे माझे कर्तव्य आहे. शेअरबाजाराला नियंत्रित करणाऱ्या संस्थांच्या बाबतीत तडजोड करण्यात आली असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता.









