योगींना संबोधिले ‘ठग’ ः उत्तरप्रदेशात भाजप अधर्म करत असल्याचे विधान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात सरकार चालवित असले तरीही त्याच्याकडून धर्म नव्हे तर अधर्म केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सामाजिक संघटनांच्या ‘भारत जोडो अभियान’ कार्यक्रमात त्यांनी ही टिप्पणी केली आहे. राहुल गांधी यांच्या या टिप्पणीवर भाजपने संताप व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली आहे.
योगी आदित्यनाथ यांना हिंदू धर्म समजला असता तर ते जे काही करत आहेत, ते केले नसते. योगी आदित्यनाथ हे स्वतःच्या मठाचा अपमान करत आहेत. योगी हे धार्मिक नेते नसून एक किरकोळ ठग (ठक) आहेत असे राहुल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हटले आहे. कार्यक्रमात एका महिलेने उत्तरप्रदेशात जे ‘धर्माचे वादळ’ आले असताना काँग्रेस काय करणार असा प्रश्न त्यांना विचारला होता.
उत्तरप्रदेशात धर्माचे वादळ आलेले नाही. हा धर्म नाही. मी इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू अन् बौद्ध धर्माबद्दल वाचन केले आहे. हिंदू धर्म मी समजतो. कुठलाच धर्म द्वेष पसरावा असे सांगत नाही. उत्तरप्रदेशात भाजप जे करतेय ते धर्म नव्हे तर अधर्म असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.
एखाद्या व्यक्तीने तपस्या करणे थांबविल्यावर त्याच्यासाठी भ्रमाची स्थिती निर्माण होते. काँग्रेस हा तपस्वींचा पक्ष आहे. तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्या विरुद्ध आहेत. भारत जोडो यात्रा हे छोटे पाऊल असून पुढील काळात आणखी प्रयत्न केले जातील असे राहुल म्हणाले.
राहुल गांधींनी मागे घ्यावे विधान
राहुल गांधी यांच्या योगींवरील टिप्पणीवर भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी केलेली टिप्पणी निंदनीय आहे. त्यांनी स्वतःचे शब्द मागे घ्यावेत असे उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे.
हिंदू, गोरखनाथ मठाचा अपमान
राहुल गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांच्यासंबंधी केलेल्या विधानाप्रकरणी माफी मागावी. त्यांनी हिंदू आणि गोरखनाथ मठाचा अपमान केल्याची टीका भाजप खासदार जगदंबिका पाल यांनी केली आहे.









