खासदार शशी थरूर यांचे वक्तव्य : ‘इंडिया’चे सरकार सत्तेवर येण्याची शक्यता
► वृत्तसंस्था/ .तिरुअनंतपुरम
आगामी लोकसभा निवडणुकीत जर ‘इंडिया’ आघाडी विजयी झाल्यास काँग्रेसच्या वतीने मल्लिकार्जुन खर्गे किंवा राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केले जाऊ शकते, असे वक्तव्य काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केले आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीचे निकाल धक्कादायक ठरू शकतात, कारण विरोधी पक्षांची एकजूट झाली आहे. इंडिया आघाडी भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआला मागे टाकून सत्तेवर येण्याची शक्यता असल्याचे थरूर यांनी तिरुअनंतपुरम येथे बोलताना म्हटले आहे.
काँग्रेस एका परिवाराचा पक्ष
निकाल समोर आल्यावर आघाडीच्या नेत्यांना एकत्र येत एक उमेदवार निवडावा लागणार आहे. माझ्या अंदाजानुसार काँग्रेस पक्षाकडून मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे केले जाऊ शकते. कदाचित ते देशाचे पहिले दलित पंतप्रधान ठरू शकतात. खर्गे यांच्याससह राहुल गांधी यांचेही नाव समोर येऊ शकते. कारण अनेकार्थाने काँग्रेसला एक परिवारच चालवत आहे. ज्या कुणाला ही जबाबदारी सोपविण्यात येईल, तो ती उत्तमप्रकारे पार पाडेल असा विश्वास असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे.
योग्यता महत्त्वाची नाही
पंतप्रधानपदाचा दावेदार केवळ त्याची पात्रता पाहून निश्चित केला जाणार नाही. आमची व्यवस्था अमेरिकन व्यवस्थेपेक्षा अत्यंत वेगळी आहे. संसदीय व्यवस्थेचा अर्थ कुणाचे नेतृत्व पुढे करावे याचा निर्णय पक्ष घेणार असा होतो. भारतात निवडणूक लढविण्याची संधी कुणाला द्यावी हे देखील पक्षच ठरवत असतो. तर अमेरिकेत मतदारच उमेदवाराची निवड करतात. भारतात ओबामांसारखी कारकीर्द निर्माण करणे शक्य नाही. आमचा देश अत्यंत मोठा आहे. येथे 543 लोकसभा मतदारसंघ आहेत. यामुळे कुठल्याही एका व्यक्तीची योग्यता महत्त्वपूर्ण ठरत नसल्याचे उद्गार थरूर यांनी काढले आहेत.
आघाडीत एकमत होणे अवघड
शशी थरूर हे राहुल गांधी किंवा खर्गे यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरवत असले तरीही इंडिया आघाडीत यावरून कुठलेच एकमत नाही. आघाडीची अंतिम बैठक मुंबई येथे पार पडली होती. त्यावेळी पंतप्रधानपदाच्या उमेदवारावरून आघाडीत सामील नेत्यांना प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी स्पष्ट उत्तर देणे त्या नेत्यांनी टाळले होते. अशा स्थितीत काँग्रेसकडून राहुल गांधी किंवा खर्गे यांचे नाव पुढे करण्यात आल्यास अन्य पक्षांकडून विरोध होण्याची दाट शक्यता आहे.









