काँग्रेस नेते राहुल गांधी संघर्षग्रस्त मणिपूरमध्ये राज्याच्या दौऱ्य़ावर आहेत. मणिपूरमध्ये वाढत्या हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या परिसराला आणि विविध समुदायांना भेटण्यासाठी ते राज्याच्या दौऱ्यावर आहेत. संवेदनशील मणिपूर राज्याचा दौरा करण्यसाठी प्रशासनाकडून राहूल गांधी यांना रोखले असून त्यांचा ताफा मणिपूरची राजधानी राजधानी इंफाळपासून 20 किमी अंतरावर असलेल्या बिष्णुपूरमध्ये अडवण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यापासून मणिपूरात हिंसाचार वाढला आहे. मणिपूरमधील चुरचंदपूर या क्षेत्राला या हिंसेचा सर्वात जास्त तडाखा बसला असून हे क्षेत्र अतिसंवेदनशील बनले आहे. राहूल गांधी चूरचंदपूर या क्षेत्राकडे कूच करत असताना त्यांना इंफाळजवळ अडवण्यात आले.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी या संदर्भात माहीती देताना, “राहुल गांधी त्यांच्या दौऱ्यादरम्यान हिंसाचारग्रस्त समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून इम्फाळ आणि चुराचंदपूर मदत शिबिरांना भेट देतील.”असे म्हटले आहे. 3 मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यानंतर कोणत्याही काँग्रेस नेत्याची ईशान्येकडील राज्याची ही पहिलीच भेट आहे.
राहूल गांधी हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या लोकांना आणि नागरी समाज गटांच्या नेत्यांना भेटण्यासाठी दोन दिवसांच्या ईशान्येकडील राज्यात आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून, मणिपूर बहुसंख्य मेईतेई आणि कुकी समुदायांमधील संघर्षांमुळे अस्वस्थ आहे. या संघर्षात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 400 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
“पोलिस म्हणतात की ते आम्हाला परवानगी देण्याच्या स्थितीत नाहीत. लोक राहुल गांधींना ओवाळण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे आहेत. आम्हाला समजत नाही की त्यांनी आम्हाला का थांबवले?” वेणुगोपाल म्हणाले. मणिपूरमधील हिंसाचारामुळे सुमारे 60,000 लोक विस्थापित झाले आहेत आणि सुमारे 350 छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले, “जवळपास दोन महिन्यांपासून मणिपूर जळत असून समाजाला संघर्षातून शांततेकडे वाटचाल करण्यासाठी उपचारात्मक स्पर्शाची नितांत गरज आहे. मणिपूरची घटना ही एक शोकांतिका असून त्यासाठी द्वेषाची नाही तर प्रेमाची शक्ती असणे सर्वांची जबाबदारी आहे,” असे केसी वेणुगोपाल म्हणाले.









