पंजाबमधील कायदा-सुव्यवस्था कोलमडल्याचा दावा
वृत्तसंस्था/ मानसा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मानसा येथे पोहोचून पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांचे वडिल बलकौर सिंह तसेच आई चरण कौर यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आहे. मूसेवालांचे आईवडिल ज्या दुःखाला सामोरे जात आहेत, ते व्यक्त करणे अवघड आहे. त्यांना न्याय मिळवून देणे आमचे कर्तव्य असल्याचे राहुल यांनी ट्विट करत म्हटले आहे.
पंजाबमधील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. पंजाबमध्ये शांतता आणि समृद्धी कायम राखणे आम आदमी पक्षाच्या सरकारला जमणारे नसल्याचा दावा राहुल यांनी केला आहे. सिद्धू मूसेवाला यांची 29 मे रोजी गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली होती.

सिद्धू मूसेवाला हे पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वडिंग यांचे निकटवर्तीय होते. मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मानसा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक देखील लढविली होती. परंतु आम आदमी पक्षाचे उमेदवार डॉ. विजय सिंगला यांनी त्यांना पराभूत केले होते. आप सरकारने मूसेवाला यांच्या सुरक्षेत कपात केली होती. याच्या दुसऱया दिवशीच मूसेवाला यांची हत्या झाली होती. पंजाबमध्ये फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. आम आदमी पक्षाने 117 पैकी 92 जागा जिंकत सरकार स्थापन केले होते. परंतु आता राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून आप सरकार लक्ष्य ठरत आहे. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारवर जोरदार टीका होत आहे.









