पंतप्रधान मोदींच्या ‘जाती’संबंधी अमित शहा यांचे संसदेत महत्वपूर्ण स्पष्टीकरण, काँग्रेसवर केले टीकेचे प्रहार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी धडधडीत खोटे बोलण्यास प्रारंभ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीविषयी जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न केविलवाणा आहे. त्यांच्या जातीसंदर्भात ते धादांत खोटी बतावणी करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केला आहे. त्यांनी महत्वाचे स्पष्टीकरणही दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्मजात मागासवर्गीय नाहीत. ते तेली जातीचे आहेत. त्यांची जात 2000 मध्ये भारतीय जनता पक्षाने मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट केली आहे, असे आरोप राहुल गांधी यांनी एका जाहीर सभेत केले होते. शहा यांनी शनिवारी या आरोपांचा चांगलाच समाचार घेऊन वस्तुस्थिती विशद केली आहे.
1994 मध्येच नोंद
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या जातीचे आहेत, ती जात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने नव्हे, तर गुजरातमधील काँग्रेसच्याच सरकारने अन्य मागासवर्गीयांच्या सूचीत समाविष्ट केली होती. 1994 मध्ये गुजरातमध्ये काँग्रेसचे छबिलदास मेहता हे मुख्यमंत्री होते. त्यांच्या सरकारने ही जात अन्य मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट केली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही सभागृहाचे निवडून आलेले सदस्य नव्हते. तसेच ते कोणत्याही घटनात्मक पदावरही नव्हते. काँग्रेस पक्षानेच 1994 मध्ये या जातीचा समावेश अन्य मागासवर्गीयांच्या केंद्रीय सूचीत करावा, अशी सूचना केंद्र सरकारला केली होती. ती सूचना 2000 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने मान्य करुन या जातीचा समावेश अन्य मागासवर्गीयांच्या सूचीत केला. आज राहुल गांधी या संबंधात धादांत खोटी विधाने जाहीररित्या करुन स्वत:चेच हसे करुन घेत आहेत, अशी टीका शहा यांनी केली.
अन्य मागासवर्गीय जात नव्हे तर गट
पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा आपण अन्य मागासवर्गिय आहोत असे म्हणतात तेव्हा ते स्वत:च्या जातीचा नव्हे, तर सामाजिक गटाचा उल्लेख करत असतात. पण राहुल गांधींना सामाजिक गट आणि जात यातील फरकच माहीत नाही. बहुतेक त्यांच्या सल्लागारांनी त्यांना हा फरक शिकविला नसावा. त्यामुळे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची जात काढून स्वत:चाच गोंधळ जाहीर करीत आहेत. त्यांना साध्या साध्या बाबीही माहीत नाहीत, अशी कठोर टीका अमित शहा यांनी केली आहे.
काँग्रेसच मागासवर्गीय विरोधी
काँग्रेस पक्षच अन्य मागासर्गियांच्या विरोधात आहे. या पक्षाने आपल्या 55 वर्षांच्या सत्ताकाळात या समाजगटाच्या हितासाठी काहीही केलेले नाही. या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्य मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक ओळख मिळवून दिली आहे. काँग्रेसने तेवढे कामही केलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अन्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये या समाजगटातील लोकांना मोठ्या प्रमाणावर सामावून घेऊन मंडल आयोगाच्या सूचनांचा मान राखला. या संदर्भांमध्ये काँग्रेसने तिच्या सत्ताकाळात नेहमीच टाळाटाळ चालविली होती, असा पलटवार त्यांनी केला.
भारतरत्न पुरस्कारांचे समर्थन
यंदा पाच मान्यवरांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. त्यांच्यापैकी चार व्यक्ती राजकीय पार्श्वभूमीच्या आहेत. त्यांना हा पुरस्कार दिला जाण्याचे समर्थन अमित शहा यांनी केले आहे. ज्या राजकारण्यांनी देशाला प्रबळ करण्याचा प्रयत्न केला, विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी केली, त्यांना हा पुरस्कार देण्यात काहीही वावगे नाही. काँग्रेसने नेहमीच या पुरस्कारासाठी गांधी-नेहरु घराण्यातील लोकांची निवड केली आहे. त्या पक्षाने आपल्या पक्षातील इतर कर्तृत्ववान नेत्यांकडेही दुर्लक्ष केले. आमच्या सरकारने मात्र, पक्षीय राजकारणाचा किंवा एखाद्या घराण्याचा विचार न करता कामगिरीच्या आधारावर हे पुरस्कार घोषित केले आहेत, असा प्रतिहल्ला अमित शहा यांनी चढविला आहे.
शहा यांचे चपखल प्रत्युत्तर
ड राहुल गांधी आणि काँग्रेसच्या आरोपांची शहा यांच्याकडून चिरफाड
ड राहुल गांधींचे सल्लागार त्यांना दिशाभूल करणारी माहिती पुरवितात
ड काँग्रेसच्या काळात भारतरत्न पुरस्कारांचे येथेच्छ राजकारण होत होते
ड भारतीय जनता पक्षाने कर्तृत्व पाहून पुरस्काराच्या मानकऱ्यांची निवड









