उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांचा दावा
► वृत्तसंस्था/ लखनौ
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये मोठा बदल करत अजय राय यांच्याकडे कमान सोपवली. याचदरम्यान राहुल गांधी अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगत आहे. येत्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी अमेठीमधून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी केला आहे. तसेच प्रियांका गांधी वाराणसीमधूनही (पंतप्रधान मोदींविरोधात) लढू शकतात, असे वक्तव्यही त्यांनी केले.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार आहेत, अशी माहिती उत्तर प्रदेश काँग्रेसचे नवे अध्यक्ष अजय राय यांनी दिली. तसेच प्रियांका गांधी यांच्याबाबतही त्यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. प्रियंकाजींची इच्छा असेल तर त्या वाराणसीतून निवडणूक लढवू शकतात. आमचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करेल, असेही ते पुढे म्हणाले. याचवेळी अजय राय यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला.
अमेठी ही काँग्रेसची जागा होती, पण 2019 च्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात उतरल्या. अमेठी लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांचा स्मृती इराणी यांनी पराभव केला. अमेठी लोकसभा मतदारसंघ ही काँग्रेसची कौटुंबिक जागा आहे. या मतदारसंघातून संजय गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी, सोनिया गांधी यांनीही लोकसभा निवडणूक जिंकली आहे. याशिवाय राहुल गांधी अमेठी लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा खासदारही राहिले आहेत, असे ते म्हणाले.
सध्या राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातून खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी सीपीआयच्या पीपी सुनीर यांचा लाखो मतांच्या फरकाने पराभव केला होता. मात्र, आता अजय राय यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उत आला आहे.









