ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मोदी आडनावावरुन केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सुरत सेशन कोर्टाने राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला आहे. शिक्षा स्थगितीच्या याचिकेवर 13 एप्रिलला सुनावणी होणार आहे.
कर्नाटकच्या कोलारमध्ये मोदी आडनावाचे सर्वजण चोर कसे असतात? असे वक्तव्य राहुल गांधीनी प्रचारादरम्यान केलं होतं. त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सुरत सेशन कोर्टाने राहुल गांधी यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांना तात्पुरता जामीन मंजूर करत अपिल करण्यासाठी 30 दिवसांची मुदतही दिली. मात्र, शिक्षा झाल्यामुळे राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले.
दरम्यान, या शिक्षेविरोधात राहुल गांधी यांनी सोमवारी सुरत सेशन कोर्टात दाखल केली. यात दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. पहिला अर्ज हा नियमित जामीन अर्ज आहे. तर दुसरा अर्ज हा शिक्षा रद्द करण्यासाठी होता. राहुल गांधींचा नियमित जामीनाचा पहिला अर्ज कोर्टाने मंजूर केला आहे. त्यावर पुढील सुनावणी 13 एप्रिल रोजी होणार आहे. तर शिक्षा रद्द करण्याच्या अर्जावर 3 मे रोजी सुनावणी होणार आहे. या अर्जाला कोर्टाने मंजुरी दिली तर त्यांना पुन्हा खासदारकी मिळू शकते.