भ्रष्टाचारात कर्नाटक देशात अव्वल : ‘40 टक्के कमिशन’वरूनही भाजपवर हल्लाबोल

बेळगाव : देशात ‘भारत जोडो’ यात्रा यशस्वी झाली असून काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत या यात्रेला जनतेचा प्रतिसाद मिळाला. दरम्यान पदयात्रेवेळी कर्नाटकातील युवकांनी बेरोजगारी व भ्रष्टाचार वाढल्याची माहिती दिली. देशात सर्वात जास्त भ्रष्टाचार कर्नाटकातील भाजप सरकारने केला आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसतर्फे सीपीएड मैदानावर सोमवारी युवा क्रांती मेळावा झाला. यावेळी त्यांनी कर्नाटकातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. व्यासपीठावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार अंजली निंबाळकर, विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी, माजी आमदार फिरोज सेठ यांच्यासह मंत्री, आमदार आणि मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
डबल इंजिन सरकार भ्रष्टाचारी
काँग्रेस नेते राहुल गांधी पुढे म्हणाले, देश गोरगरीब जनतेचा आणि युवकांचा आहे. मात्र येथील डबल इंजिन सरकार 40 टक्के कमिशन व भ्रष्टाचारी आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे होत असून हा देश एकट्या दुकठ्याचा नसून तो गरीब, कष्टकरी, श्रामिक या सर्वांचा आहे. कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशनचे असून येत्या निवडणुकीत हे सरकार हटविले पाहिजे, असे आवाहनदेखील त्यांनी केले. शिवाय येत्या निवडणुकीत कर्नाटकात जेथे माझी गरज पडेल, त्याठिकाणी मी जाईन, असेही त्यांनी सांगितले.
बेळगावची भूमी पवित्र : खर्गे
यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, बेळगावची भूमी पवित्र असून याठिकाणी महात्मा गांधीजींचे अधिवेशन झाले. दरम्यान गांधीजींनी हा गरिबांचा देश असून उच्च-नीच भेदभाव केला जाणार नाही, अशी घोषणा दिली होती. मात्र ती घोषणा आता भाजपकडून पायदळी तुडवली जात आहे. काँग्रेसने ‘भारत जोडो’ यात्रा काढून देशातील महागाई, बेरोजगारी या विरोधात आवाज उठविला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राहुल गांधी आणि इतर नेते व मंत्र्यांच्या हस्ते युवा गॅरंटी कार्डचे अनावरण करण्यात आले. याला उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते, समर्थक उपस्थित होते.
महिला, युवकांसाठी घोषणांचा ‘पाऊस’
पदवीधर विद्यार्थ्यांना प्रतिमहिना 3,000 रुपये, डिप्लोमाधारकांना प्रतिमहिना 1,500 रुपये, दहा लाख युवकांना रोजगार उपलब्ध करणार, 10 हजार रिक्त जागा भरणार, महिलांना प्रतिमहिना 2000 रुपये, बीपीएल कार्डधारकांना 10 किलो धान्य, 200 युनिट मोफत वीज दिली जाणार आहे, अशी घोषणादेखील मेळाव्यात करण्यात आली.









